Sangli News : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्योग आले नाहीत. आमचे सरकार आल्यावर मात्र उद्योग पळाले-पळाले असे म्हणतायत. तुमच्या काळात तुम्ही उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवले. मग उद्योगपती पळणार नाही तर काय? सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्लामपूर येथील जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. मी मुख्यमंत्री झाल्यावर लाखो कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणली. आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांना शिव्या शाप देण्याशिवाय काही राहिले नाही.
इस्लामपूर येथे 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराजे देसाई, खासदार धैर्यशील माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा डॉ. राजा दयानिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पूर्वी लाभ घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. हे शासन गोरगरीब, शेतकरी, कामगार, वारकरी यांचे आहे. या योजना सामान्यांना मिळत नसतील तर शासनाचा उपयोग काय? म्हणून आम्ही हा शासन आपल्या दारी हा उपक्रम आणला. लोकाभिमुख सरकारला आशीर्वाद देण्यासाठी आपण आलात. जिल्ह्यातील 35 लाख 65 हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. साडेचार कोटी रुपयांचा लाभ मिळाला.
यापूर्वी कधी लाभार्थी व्यासपीठावर दिसले नाहीत. आपण त्यांना व्यासपीठावर आणले. घरी बसून काम होत नाही. कोविडमध्ये ठीक होतं, फेसबुक लाईव्ह होतं. मात्र, त्यांनतर लोकांमध्ये जावे लागते. आम्ही लोकांमध्ये गेलो, बांधावर गेलो. लोकांमध्ये जाणारे सरकार अशी स्पर्धा घेतली तर आमच्या सरकारचा नंबर येईल. आम्ही पहिला निर्णय घेतला की, दुष्काळी भागाला पाणी वळवण्याचा निर्णय घेतला.
सिंचनाचे प्रकल्प आमच्या सरकारमध्ये 120 झाले. 15 लक्ष हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदानाचे 50 हजार रुपये देण्याचा निर्णय हा मागच्या सरकारचा जरी असला तरी आम्ही ते पैसे देऊ. केवळ पोकळ घोषणा करणारे आमचे सरकार नाही तर घोषणा करून अंमलबजावणी आम्ही करतो. महिलांनी बचतगट वाढवावा. त्यांच्या उत्पादनच्या विक्रीसाठी आम्ही मदत करू.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aaghadi) काळात अनेक उद्योग पळाले. त्यांच्या नेत्यांनी उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवला, त्यामुळे उद्योगपतींना पळून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही, मात्र आम्ही सत्तेवर आल्यानंतर मोठी गुंतवणूक झाली. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांना शिव्या शाप देण्याशिवाय काही राहिले नसल्याची टीका उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर नाव न घेता केली. काही लोकांचे रडगाणे सुरू आहे. हे चोरले ते चोरले बाळासाहेबांचे विचार ही काय चोरण्याची गोष्ट नाही.
मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले. पाहिले उद्योग आले तर माझं काय हे होत. शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री व्हायचा नाही काय? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलाच मुख्यमंत्री व्हायचे काय. माझे कुटुंब माझी जबाबदारी नाही तर सर्वसामान्य जनता माझी जबाबदारी आहे. हीच त्यांची पोटदुखी आहे. हे सरकार पूर्णपणे लोकभिमुख आहे. हे देणार सरकार आहे, घेणारे सरकार नाही. लोकांसाठी आम्ही मर मर मरतोय. म्हणून लोक आम्हाला आशीर्वाद देतायत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.