

शक्तिपीठ महामार्गाला विरोध असूनही हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे.
सांगलीतील विरोधावरून जयंत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी खोचक टीका केली.
या वक्तव्यानंतर सांगलीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Nagpur/Sangli News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यभर असलेल्या विरोधानंतरही तो आता पुर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात याला मोठा विरोध झाला आहे. सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी देखील जोरदार विरोध केला होता. यावरूनच राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे. त्यांनी जयंत पाटील यांनी मोठा विरोध केला मात्र आता तेच मला यासाठी पत्र देतील असे म्हणत दावा केला आहे. यामुळे आता नागपुरच्या थंडीत केलेल्या या दाव्यामुळे सांगलीत मात्र गरमी वाढण्याची शक्यता आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना, बहुचर्चित नागपूर–गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाबाबत महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी यावेळी महामार्गाच्या नव्या अलायमेंटची माहिती विधानसभेत दिली. यावेळी त्यांनी महामार्गाची दिशा बदलण्यात आल्याचे सांगताना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून होत असलेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
तसेच यावेळी त्यांनी नव्या अलायमेंटबाबत सांगताना, महामार्गाच्या सुरुवातीच्या अलायमेंटबाबत अक्षेप घेण्यात आला. जो योग्यच होता. कारण यात काही त्रुटी राहिल्या होत्या, ज्या लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी लक्षात आणून दिल्या. विशेष म्हणजे हा राष्ट्रीय महामार्गाला समांतर जात असल्याचे समोर आले.
यामुळे आमचा उद्देश हा राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणे नसून, ज्या भागांमध्ये कनेक्टिव्हिटी नाही ते भाग जोडून तिथे विकास घडवून आणण्याचा आहे. त्याप्रमाणे आता शक्तिपीठ महामार्गाची दिशा बदलण्यात आली असून, सोलापूरपासून पंढरपूर पुढे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरातून हा महामार्ग जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे.
तसेच याबाबत मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार अभिजीत पाटील यांच्याशी चर्चा केली असून सोलापूर ते कोल्हापूरदरम्यान नवी अलायमेंट निश्चित करण्यात आली आहे. तर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचाही यात समावेश करण्यात आला आहे. यामुळे सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील मतदारसंघांना याचा मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गा नव्या अलायमेंटमध्ये वाळवा तालुक्याचा समावेश झाल्यावरून जयंत पाटील यांना डिवचत त्यांनी याला विरोध केला. त्यामुळे हा महामार्ग त्यांच्या मतदारसंघाबाहेर गेला आहे. पण आता तर तो त्याच्या जवळ आला आहे. यामुळे भविष्यात जयंत पाटील स्वतः मला पत्र देतील. ते स्वतः हा महामार्ग करण्याची मागणी करतील, असाही दावा फडणवीस यांनी केला आहे.
तर नव्या अलायमेंटमध्ये अतिशय कमी वनजमीन बाधित होणार असल्याने परवानग्या मिळण्यात फारसी अडचण येणार नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. शक्तिपीठ महामार्ग राज्यातील प्रमुख शक्तिपीठांना जोडणारा असल्याने दुष्काळी भाग, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल असाही दावा फडणवीस यांनी केला आहे.
1. शक्तिपीठ महामार्गाला विरोध का झाला आहे?
शेतजमीन संपादन आणि पर्यावरणीय कारणांमुळे स्थानिक स्तरावर विरोध झाला.
2. जयंत पाटील यांनी काय भूमिका घेतली होती?
सांगली जिल्ह्यात प्रकल्पाविरोधात त्यांनी जोरदार भूमिका मांडली होती.
3. देवेंद्र फडणवीस यांनी काय दावा केला?
आज विरोध करणारे जयंत पाटील उद्या प्रकल्पासाठी पत्र देतील, असा दावा केला.
4. हा प्रकल्प सध्या कुठपर्यंत आला आहे?
विरोध असूनही प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे.
5. या वक्तव्यानंतर राजकीय परिणाम काय असू शकतात?
सांगली जिल्ह्यात राजकीय तापमान वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.