
Ajit Pawar - Udaysinh Patil Undalkar : रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि काँग्रेस नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या 19 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये उंडाळकर यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यांच्या प्रवेशाने कराड आणि पाटण तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळू शकते.
उदयसिंह पाटील हे सध्या काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. पण गेल्या महिन्याभरापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ हातात बांधणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. दरम्यानच्या काळात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अजित पवार कराड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अचानक उंडाळकर यांच्या कोयना बँकेला सदिच्छा भेट दिली.
इथे आधी अजित पवार, उंडाळकर यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर काही प्रमुख कार्यकर्त्यांसोबत या दोघांची बैठक पार पडली. इथेच उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला. त्यांच्या पक्षप्रवेशामागे मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांचीही भूमिका महत्वाची ठरली. त्याचा उल्लेखही उंडाळकर यांनी अजितदादांसोबत झालेल्या बैठकीत केला.
अजितदादांसोबत झालेल्या बैठकीत उंडाळकर यांना ताकद देऊन त्यांचे पालकत्व घ्यावे, अशी विनंती रयत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर अजितदादा म्हणाले,विलासकाका उंडाळकरांची काम करण्याची पद्धत आणि शिस्त मी जवळून पाहिली आहे, ज्या शिस्तीने त्यांनी तुम्हाला घडवले, ती शिस्त उदयसिंहांच्या सहकारी संस्थांमधून दिसत आहे.
विलासकाकांचा वारसा पुढे नेण्याचे काम तुम्ही करता त्याचे मोठे समाधान वाटते, यापुढे उदयसिंह पाटील यांना राजकीय ताकद आणि मदत देण्यात येईल, त्यामुळे ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चिंता करू नये, असा शब्दही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उंडाळकर गटाला दिला. थेट अजितदादांनी ताकद देण्याचा शब्द दिल्याने उंडाळकर यांचा राजकीय प्रभाव जिल्ह्यात वाढणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.