Sangli News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात विकासकामांवरून वाद पेटला आहे. नागठाणे येथे प्रत्येक कामाची दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळी उद्घाटने केली जात आहेत, प्रसंगी पोलिस बंदोबस्तही मागवला जात आहे, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (Sangli Politics)
भाजपच्या वतीने नागठाणे (ता. पलूस) येथे रस्ते कामाचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे देशमुख यांनी नागठाणे आणि इतरही काही ठिकाणच्या कामांची उद्घाटने उरकली. (Vishwajeet Kadam VS Prithviraj Deshmukh)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हे सगळे घडवून आणणारे भाजपचे नेते विजय पाटील यांनी मात्र परिस्थिती लक्षात घेऊन व्यासपीठावर न जाता समोर बसणे पसंत केले. या विकासकामांची उद्घाटने काँग्रेसकडून यापूर्वीच करण्यात आल्याने कार्यक्रमात बाधा येऊ नये म्हणून भिलवडी पोलिस ठाण्याचा बंदोबस्तही तैनात होता.
नागठाणे ते सूर्यगावदरम्यानच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नियोजित होते. भाजपने त्याबाबतची तयारी केली होती, परंतु मंत्री महाजन मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे कोनशिलेचे अनावरण माजी जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी केले. याच रस्ते कामाचे उद्घाटन गेल्या महिन्यात २४ जानेवारीला आमदार विश्वजित कदम यांनी केले होते. (Controversy over credit)
जलजीवन मिशनअंतर्गत पाणी योजनेच्या कामाचे उद्घाटनही दोन्ही गटांनी एकेकदा केले आहे. प्रत्यक्षात पाणी योजनेच्या कामाची अद्याप सुरुवातही झाली नाही. सामान्य नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी झटत असल्याचे सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपचे नेते वारंवार सांगत आहेत. केवळ राजकीय फार्स करण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून केला जात असल्याची चर्चा सुरू आहे.
Edited By : Vijay Dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.