DY Patil : 'तो' एक पराभव जिव्हारी लागला अन् डी. वाय पाटलांनी राजकारण सोडलं; आमदार ते शिक्षणमहर्षी असा आहे प्रवास...

DY Patil political career : एका निवडणुकीतील पराभवानंतर डॉ. डी.वाय पाटील यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण लक्ष शिक्षण आणि समाजसेवेकडे केंद्रित केले. या निर्णयातूनच पुढे 'डी. वाय. पाटील' हे नाव देशातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित ब्रँड म्हणून उदयास आले
Dr DY Patil | Political Career | Education Empire
Dr DY Patil | Political Career | Education EmpireSarkarnama
Published on
Updated on

निवास चौगले

DY Patil biography : शिक्षणमहर्षी, समाजसेवक आणि बिहार, त्रिपुरा तसेच पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी (४ ऑगस्ट) कोल्हापूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या दूरदृष्टी, नेतृत्व आणि समाजसेवेच्या बळावर देशभरात शिक्षणाचा मजबूत पाया रचला.

आज त्यांच्या नावाने वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि विविध उच्च शिक्षण संस्थांचे विस्तीर्ण जाळे उभे असून, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, डॉ. डी. वाय. पाटील यांची कारकीर्द केवळ शिक्षणापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी सुरुवातीच्या काळात सक्रिय राजकारणातही काम केले आणि महाराष्ट्राच्या राजकीय व सहकार क्षेत्रात आपली छाप पाडली.

मात्र, एका निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण लक्ष शिक्षण आणि समाजसेवेकडे केंद्रित केले. या निर्णयातूनच पुढे 'डी. वाय. पाटील' हे नाव देशातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित ब्रँड म्हणून उदयास आले

राजकीय करिअर

घरातील वारकरी संप्रदायाची परंपरा, शेतकरी कुटुंबातील वातावरण आणि त्याच काळात विविध आंदोलनाच्या माध्यमातून डॉ. डी. वाय पाटील हे राजकीय व सामाजिक क्षेत्राकडे वळले. १९६४ मध्ये त्यांना युवक काँग्रेसच्या माध्यमातून कैरो व युगोस्लाव्हिया येथील यूथ कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांच्या राजकीय करिअरला योग्य दिशा मिळाली.

पक्षांतर्गत त्यांच्या कार्याची दखल घेऊन काँग्रेसने त्यांना १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळच्या पन्हाळा-बावडा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या पहिल्याच निवडणुकीत अवघ्या ३२ व्या वर्षी ते २५ हजार मते घेऊन विजयी झाले. विधानसभेत त्या काळात सर्वात तरुण आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यानंतर १९७२ च्या निवडणुकीतही ते याच मतदारसंघातून विजयी झाले.

Dr DY Patil | Political Career | Education Empire
Vikram Kakade News: 'अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करा..'; आमदार विक्रम काकडेंची अमित शाह यांच्याकडे मागणी

पराभव

१९७८ च्या निवडणुकीत त्यांना पक्षांतर्गत कारवाईची झळ बसली. त्यातून त्यांची काँग्रेसची उमेदवारी कापण्यात आली. पुढे १९८० मध्ये विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या, त्यात पुन्हा काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली; पण या निवडणुकीत अपक्ष उमेदवार यशवंत एकनाथ पाटील यांनी त्यांचा पराभव केला. या निवडणुकीत यशवंत पाटील यांना ३८ हजार ८००, तर डॉ. पाटील यांना अवघी १२ हजार ९१३ मते मिळाली.

१९८० च्या विधानसभा निवडणुकीतील पराभव डॉ. पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यात त्यांचे मूळ गाव कसबा बावडा याचाही समावेश या मतदारसंघात होता, या गावातूनच त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. या निवडणुकीत त्यांना मोठी आर्थिक किंमतही मोजावी लागली. आर्थिक फटका आणि झालेला पराभव यामुळे निराश झालेल्या डॉ. पाटील यांनी त्याचवर्षी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत थेट मुंबई गाठली.

Dr DY Patil | Political Career | Education Empire
DY Patil passes away : पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचं निधन, वयाच्या 90 व्या वर्षी कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

दोनवेळच्या आमदारकीच्या काळात त्यांचे राज्यातील अनेक राजकीय नेत्यांशी निकटचे संबंध आले. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी व त्यांच्या कुटुंबीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते; पण या संबंधाचा राजकीय फायदा त्यांनी कधी घेतला नाही. १९८० ला ते आमदार झाले असते, तर मंत्रिपदाची संधी त्यांना मिळाली असती, तसे झाले असते तर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले असते; पण पराभवाने नाराज झालेल्या डॉ. पाटील यांचा राजकारणातील रस कमी झाला आणि वयाच्या ४५ व्या वर्षी ते राजकारणापासून दूर गेले.

'टर्निंग पॉईंट'

राजकारणातील निवृत्तीनंतर त्यांचा निकटचा संबंध आला तो तत्कालीन शिक्षण मंत्री रामराव आदिक यांच्याशी. त्यांच्याशी असलेल्या मैत्रीतून त्यांनी कोल्हापुरात महालक्ष्मी चेंबर्स येथे रामराव आदिक एज्युकेशन सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी खासगी क्षेत्रालाही अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण संस्था सुरू करण्याची परवानगी दिली. हा डॉ. पाटील यांच्या आयुष्यातील मोठा 'टर्निंग पॉईंट' ठरला. राजकारणातून बाहेर पडल्यानंतर उर्वरित आयुष्यात त्यांनी जे काही केले ते एका सरकारलाही उभे करता येणार नाही, एवढे प्रचंड साम्राज्य त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नावाभोवती उभे केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com