
कॉरिडॉरला विरोध – पंढरपूरला पर्यटनस्थळ बनविणाऱ्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाचा तीव्र विरोध करत ॲड. जगदीश शेट्टी यांनी तो रद्द करण्याची मागणी केली.
मंदिर सरकारमुक्त करण्याची मागणी – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारच्या ताब्यातून मुक्त करून मूळ पुजाऱ्यांच्या ताब्यात देण्याची सूचना करण्यात आली.
कायदेशीर कारवाईची तयारी – कॉरिडॉरविरोधी अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची घोषणा बैठकीत करण्यात आली.
Pandharpur, 15 September : पंढरपूर हे देशातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. राज्य सरकारने हे पवित्र तीर्थक्षेत्र कॉरिडॉर करून पर्यटनस्थळ बनवू नये. येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातील वकील तथा डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांचे सहकारी ॲड. जगदीश शेट्टी यांनी केली आहे. तसेच, ‘डॉ. स्वामी कुणालाही घाबरत नाहीत. ते भाजप नेते असले तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कॉरिडॉर रद्द करावा, असा सल्ला ते देऊ शकतात,’ असा दावाही ॲड शेट्टी यांनी केला आहे.
पंढरपूरमध्ये (Pandharpur) तीर्थक्षेत्र बचाव कॉरिडॉर विरोधी कृती समितीच्या वतीने पंढरपूर येथील एकनाथ भवन येथे रविवारी (ता. 14 सप्टेंबर) सायंकाळी कॉरिडॉर विरोधात बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत शेट्टी बोलत होते. या वेळी कॉरिडॉर विरोधी कृती समितीचे प्रमुख नेतेमंडळी व इतर मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी 80 टक्के केसेस जिंकल्या आहेत. डॉ. स्वामी कुणालाही घाबरत नाहीत. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी (Dr. Subramanian Swamy) यांनी तमिळनाडू येथील नटराज मंदिर मुक्त केले आहे. तसेच, उत्तराखंड येथील 51 मंदिरे सरकारच्या ताब्यातून मूळ पुजाऱ्यांच्या ताब्यात दिली आहेत, त्यामुळे ते भाजप नेते असले तरीही मुख्यमंत्री फडणवीस यांनही कॉरिडॉर रद्द करण्यासंदर्भात सल्ला देऊ शकतात, असा दावा शेट्टी यांनी केला.
जगदीश शेट्टी म्हणाले, प्रस्तावित कॉरिडॉरच्या विरोधात अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. कॉरिडॉरचे संकट दूर करण्यासाठी संघटित व्हा, घाबरून जाऊ नका. संघटित राहून लढा दिल्यास कॉरिडॉर विरोधात आपण जिंकू शकतो.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर सध्या सरकारच्या ताब्यात आहे. मात्र, ते सरकारच्या ताब्यातून आपण मुक्त करू शकतो. कोणतेही सरकार पारंपरिक व धार्मिक अधिकार हिरावून घेऊ शकत नाही, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.
यावेळी ॲड. धनंजय रानडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अभयसिंह इचगावकर यांनी केले. सूत्रसंचालन रामकृष्ण महाराज वीर यांनी केले. आभार डॉ. प्राजक्ता बेणारे यांनी मानले. या मार्गदर्शन बैठकीस मंदिर परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्र.1: पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाला का विरोध आहे?
उ. – तो धार्मिक तीर्थक्षेत्राचे स्वरूप बदलून पर्यटनस्थळ बनवेल अशी भीती आहे.
प्र.2: मंदिराबाबत प्रमुख मागणी काय आहे?
उ. – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करून पुजाऱ्यांच्या ताब्यात द्यावे.
प्र.3: सर्वोच्च न्यायालयात काय होणार आहे?
उ. – कॉरिडॉर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली जाणार आहे.
प्र.4: डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांचा उल्लेख का झाला?
उ. – त्यांनी इतर राज्यांत मंदिरे सरकारमुक्त करण्याची यशस्वी लढाई लढली असल्यामुळे त्यांचा अनुभव नमूद केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.