

Mumbai, 23 March : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या राड्याने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. मतदानावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांना मतदान करू द्यावे, यासाठी सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशींना दोनवेळा फोन केला होता. तसेच, राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दातेंनीही तशी सूचना केली होती, त्यानंतरही दोशींनी राष्ट्रवादीच्या दोघांना मतदानात सहभागी होण्यापूर्वीच उचललं, त्यामुळे दोशींना एवढ मोठं बळ देणारा गॉडफादर कोण, अशी चर्चा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवेदनानंतर रंगली आहे.
सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन सदस्यांना मतदान करू दिले नाही, ते सभागृहात जाण्यापूर्वीच त्यांना अटक करून महाबळेश्वरच्या दिशेने नेण्यात आले. त्यावेळी झालेल्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्याचे तीव्र पडसाद आज विधीमंडळात उमटले.
विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशींवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी निवेदन केले आहे. त्यात शिंदे म्हणाले, अर्जून खोतकर आणि शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची घटना मांडली आहे. त्याचा मीही साक्षीदार आहे. कारण या निवडणूक प्रक्रियेची तारीख जाहीर झाली, त्यावेळी मला शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी फोन केला होता. दोन सदस्यांवर कधीकाळीचा गुन्हा एक दिवस अगोदर दाखल केलेला आहे आणि त्यांना अटक करण्यात येणार आहे, असे त्यांनी मला सांगितले.
त्यानंतर सातारचे पोलिस अधीक्षक तुषार दोशींना फोन करून काय प्रकार आहे, असे विचारलं. त्यावर त्यांनी गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. मी त्यांना एकच सांगितलं की, उद्या मतदान आहे. मतदानापासून कोणालाही वंचित ठेवता येत नाही. उलट न्यायालय ‘संबंधितांना मतदानात भाग घेऊ द्या, असा आदेश देतं. जेलमधून मतदानाला येतात. अशा परिस्थितीत आपण त्यांना मतदानापासून वंचित ठेवू नये, त्यांना वंचित ठेवता येणार नाही, मतदान झाल्यानंतर काय असेल ती शहनिशा करा, असे मी एसपी दोशींना सांगितलं होतं, असंही शिंदे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, त्यावर एसपी दोशींनी असं काही होणार नाही. कोणत्याही सदस्याला मतदानापासून वंचित ठेवलं जाणार नाही, असे मला सांगितले होते. त्यानंतर मी पोलिस महासंचालक दाते यांना फोन केला आणि साताऱ्यातील परिस्थिती सांगितली. मला जरा शंका आहे. तिथले एसपी, दोन मतदारांना कारण बहुमत शिवसेना-राष्ट्रवादीकडं होतं. मत कमी करण्यासाठी आणि निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी असा प्रकार होऊ शकतो, असं मी दातेंना सांगितलं.
त्यानंतर दातेंनी सातारच्या पोलिस अधीक्षकांना फोन केला. त्यानंतर मी स्वतः दोशी यांच्याकडे खात्री केली की, त्यावेळी दोशी म्हणाले की, मला पोलिस महासंचालक दाते यांचा फोन आला होता, मी त्यांना कुणालाही मतदानापासून वंचित ठेवणार नसल्याचे सांगितलं आहे. मी त्यांना सांगितलं की, तुमची लोकं गेटवर थांबली आहेत, त्यांना मतदान झाल्यानंतर कारवाई करण्याची सूचना तुम्ही द्या. पण मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणं, हा गुन्हा आणि लोकशाहीचा खून आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करू नका, असं सांगितलं हेातं. त्यांनीही असं काही होणार नाही, अस स्पष्ट केलं होतं. त्यावर दोशी यांनी असं काही होणार नाही, असा शब्द त्यांनी मला दिला होता, असेही शिंदे यांनी स्पष्ट केलं.
आमदार, पदाधिकारी यांना न पाहता पोलिस राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना आरोपीप्रमाणे घेऊन गेले. त्यानंतर मी डीजी फोन केला, त्यावर त्यांनी असं होणार नाही, असं सांगितलं. अहो होणार नाही काय पोलिस ते दोघांना घेऊन गेले आहेत. निवडणूक पार पडतेय तिकडे, निवडणूक झाल्यानंतर काय उपयोग आहे, असंही विचारलं. महाराष्ट्रात मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम पहिल्यांदाच घडतंय, असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
एकंदरीतच राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि संदीप मांडवे या सदस्यांना मतदान करू द्यावे, यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोनवेळा फोन केला. राज्याचे पोलिस महासंचालकांनी सूचना केली, तरीही सातारचे पोलिस अधीक्षक दोशी यांनी त्या दोघांना मतदान करू दिले नाही, त्यामुळे दोशींना बळं देणारा गॉडफादर कोण, असा सवाल आता चर्चिला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.