Agriculture Department: राज्यात खतांचा काळाबाजार आणि साठेबाजी करून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने आता सडकून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कृषी विभागाच्या विशेष मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १०७ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ६ परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत. तर, सर्वाधिक गंभीर प्रकरणांमध्ये ७ खत विक्री केंद्रांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आल्याने खत माफियांचे धाबे दणाणले आहेत. एप्रिल २०२६ पर्यंतच्या कारवाईचा हा अहवाल समोर आला आहे.
कृषी विभागाने पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत एकूण २ हजार ५७६ परवानाधारक केंद्रांची कसून तपासणी करण्यात आली. त्यापैकी २८१ प्रकरणांमध्ये खतांचा काळाबाजार आणि मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे उघडकीस आले आहे. कृषी विभागाने यातील २७७ केंद्रांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे.
कुठे झाली कारवाई?
कृषी विभागाने तिन्ही जिल्ह्यांत केलेल्या धडक कारवाईत पुणे जिल्ह्यात एकूण ६५० केंद्रांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७१ प्रकरणांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली. कृषी विभागाने तत्काळ पावले उचलत २७ विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात ८१२ खत विक्री केंद्रांची तपासणी झाली. नियम धाब्यावर बसवणाऱ्या १६ केंद्रांचे परवाने निलंबित, तर २ केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय, गंभीर गैरव्यवहार करणाऱ्या ३ केंद्रांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात कृषी विभागाने सर्वाधिक म्हणजेच १ हजार १२९ केंद्रांची तपासणी केली. तपासणी दरम्यान १८ प्रकरणांमध्ये खतांचे नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले. या कारवाईत सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ६४ परवाने निलंबित करण्यात आले असून ४ परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच ४ केंद्रांवर गुन्हे दाखल करून पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडमध्ये आला असून, आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. खतांची साठेबाजी किंवा खतासोबत इतर औषधे खरेदी करण्याची सक्ती केल्यास परवाना थेट रद्द केला जाईल, असा सज्जड दमही प्रशासनाने दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.