
Solapur, 25 January : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती तथा ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचे आज (ता. २५ जानेवारी) छत्रपती संभाजीनगर येथे निधन झाले. ते 88 वर्षांचे आहेत. संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. माजी न्यायमूर्ती चपळगावकर यांचे सोलापूरशी विशेष नाते होते, ते त्यांनी शेवटपर्यंत जपले होते.
नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgaonker ) यांचा न्यायदानाच्या क्षेत्रात तर नावलौकिक होताच. पण साहित्याच्या क्षेत्रातही त्यांना आदराचे स्थान होते. वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. मानवतावादी विचाराचे ते खंदे पुरस्कर्ते होते. नरेंद्र चपळगावकर यांचे आडनाव हे कुलकर्णी होते. मात्र बीडला गेल्यानंतर त्यांना चपळगावकर या नावाने ओळखले जाऊ लागले. ते त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवले होते
सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव हे नरेंद्र चपळगावकर यांचे मूळ गाव होते. मात्र, त्यांच्या पूर्वजांनी नोकरी आणि व्यवयासाच्या निमित्ताने गाव सोडले होते. चपळगावकर यांचा जन्म बीडचा. त्याच ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही दिवस लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर बीडमध्ये त्यांनी वकिली सुरू केली, असे ज्येष्ठ पत्रकार शांताकुमार मोरे यांनी ‘सकारनामा’शी बोलताना सांगितले.
औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती असताना त्यांनी प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात यावीत, असा ऐतिहासिक निर्णय घेतला हेाता, असेही मोरे यांनी सांगितले. त्यांनी केसरी, मराठवाडा, सकाळ, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांमध्ये विपुल लेखन केले आहे, अशीही आठवण मोरे यांनी कथन केली.
नरेंद्र चपळगावकर यांचे वडिल पुरुषोत्तम चपळगावकर हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांनी लिहिलेल्या ‘घडून गेलेल्या गोष्टी’ या पुस्तकात आपले मूळगाव सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव हे आहे, असे नरेंद्र चपळगावकर यांच्या वाचनात आले. त्या वेळी ते औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती होते. त्यावेळी त्यांनी सोलापूरच्या न्यायधीशांना आपण सोलापूरला गाव पाहण्यासाठी येणार असल्याचा निरोप दिला हेाता, असे आठवण साखर कारखानदारीतील जाणकार आणि चपळगावे सुपुत्र रविकांत पी. पाटील यांनी सांगितली.
पाटील यांनी सांगितले की, चपळगावला आल्यानंतर त्यांनी गावातील शाळेला भेट दिली. गावात त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली होती. गावातील मल्लिकार्जून मंदिराची पाहणी केली. तसेच, त्यांनी आपल्या जुन्या घरालाही भेट दिली होती. गावाबद्दल त्यांना प्रचंड आपुलकी होती. त्यानंतर ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष पी. वाय. पाटील यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमालाही हजेरी लावली होती.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी म्हणाले, चपळगावहून बीड येथे वास्तव्यास गेलेल्या कुलकर्णी कुटुंबाचे आडनाव त्याकाळी बदलले गेले. आडनावासोबतच गावाचे नाव जोडून त्यांनी चपळगावला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.