
Solapur, 18 August : संपर्कप्रमुख असूनही शिवसेनेच्या कामकाजात विश्वासात घेतले जात नाही. पक्षातील संघटनात्मक पातळीवरील निवडी परस्पर केल्या जातात, असे सांगून पदाचा राजीनामे देणारे शिवाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. या सर्व घडामोडीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू सहकारी संजयमामा शिंदे यांनी सावंतांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओढण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.
शिवसेनेचा संपर्कप्रमुख असूनही माझ्या माढा तालुक्यातील तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुखपदाच्या नियुक्त्या मला विचारात न घेता केल्या गेल्या आहेत. जिल्ह्याच्या संदर्भात निर्णय घेताना विश्वासात घेतले जात नाही. वरिष्ठांचा विश्वास नसल्यामुळे मी शिवसेना संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचे शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांनी सांगितले होते.
पक्षश्रेष्ठींना शिष्टमंडळासह भेटून आणि राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून सावंत यांची साधी चौकशीही करण्यात आली नाही. त्यामुळे चिडलेल्या सावंत समर्थकांची १६ ऑगस्ट रोजी माढ्यात बैठक झाली. त्या बैठकीत समर्थकांनी शिवाजी सावंत यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करावा, अशी भूमिका मांडली. तसेच ज्या पक्षात २५ वर्षांहून अधिक काळ घालवला, त्या पक्षाच्या कामकामाजात शिवाजी सावंतांना विचारात घेतले जात नाही. त्या पक्षात आता थांबण्याची गरज नाही, आता आपल्याला भाजपमध्ये जाण्याची गरज आहे, असेही मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले होते.
ज्या पक्षात संघटनात्मक निवडीच्या वेळी विश्वासात घेतले जात नाही. माझ्याच माढा तालुक्यात मला न विचारता तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुखांच्या नियुक्त्या होत असतील तर पक्षाकडून मिळणारी वागणूक ही स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी आहे. स्वाभिमान गहाण ठेवून पक्षात राहण्यात काय अर्थ आहे, असे सांगून शिवाजी सावंतांनीही शिवसेना सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
समर्थकांच्या मेळाव्यानंतर शिवाजी सावंत यांनी शनिवारी (ता. 16 ऑगस्ट) पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत सावंत-गोरे यांची बंद खोलीत चर्चा झाली होती. त्या चर्चेनंतर रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सांवत आणि समर्थकांनी भेट घेतली आहेत. पण, तत्पूर्वीच अजित पवारांचे खंदे समर्थक माजी आमदार संजयमामा शिंदेंनी सावंतांसाठी डाव टाकला आहे.
संजयमामा शिंदे यांनी शिवाजी सावंत यांचे चिरंजीव ऋतुराज सावंत यांना फोन करून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे. सावंत पिता-पुत्रांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घालून देण्यात येईल, असे सांगितले गेल्याची माहिती आहे. त्याला खुद्द शिवाजी सावंत यांनी दुजोरा दिला असून आमच्या मुलाला संजयमामा शिंदे यांनी भेटीचा निरोप दिलेला आहे, असे म्हटले आहे. शिवाजी सावंत समर्थकांचा मात्र भाजपकडे ओढा असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.