
Sindhudurg News : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांदा ते बांदापर्यंत आता गळती लागली आहे. माजी खासदारांसह आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. कोकणात ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group) धक्क्यांवर धक्के लागत असतानाच आता आणखी यात भर पडली आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी कोकणातील आणखी एक मोठा चेहरा उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्गात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली असतानाच माजी आमदार वैभव नाईक गड राखण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच त्यांची साथ जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी सोडली आहे. ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली आहे. यामुळे वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
पण याही पेक्षा मोठा धक्का सिंधुदुर्गात शिवसेना ठाकरे गटाला बसण्याचा दावा आजच (ता.18) शिंदे गटाचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. त्यांनी, भास्कर जाधव, वैभव नाईक शिंदे गटात येतील असा दावा केला होता. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. यातच आता कोकणातील दुसरे नेते भरत गोगावले यांनी वैभव नाईक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटलं आहे.
गोगावले यांनी, नाईक आमच्या संपर्कात असून सर्वच गोष्टी माध्यमांना सांगायच्या नसतात. काही गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात. पण ते आमच्या संपर्कात असल्याचेही गोगावले म्हणाले. यानंतर आता नाराज वैभव नाईक खरचं शिंदेंच्या संपर्कात आहेत का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे एसबीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यांनतर त्यांचा विधानसभेत पराभव झाला. त्यांचा पराभव उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनी केला. तर अनेकदा साळवी-सामंत आमने- सामने आले होते. जिल्ह्यात कट्टर विरोधक अशी ही जोडी मानली जात होती. मात्र आता ते ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेले आहेत. तर सत्तेत राहून चौकशीचा फेरा टाळण्यासाठीच ते शिंदेंच्या बरोबर गेल्याचे बोलले जात आहे.
आता असाच चौकशीचा फेरा वैभव नाईक यांच्या मागे लागला असून तेही उद्धव ठाकरे यांची साथ सोडतील अशा चर्चा रंगल्या आहेत. अशाच वेळी भरत गोगावले यांनी नाईक शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा करून राजकीय भूकंप केला आहे.
दरम्यान संजय पडते यांनी ठाकरे यांना पत्र लिहत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पडते यांनी, आपल्या भावना व्यक्त करताना, आतापर्यंत शिवसैनिकांसाठी प्रामाणिक व निष्ठेने काम केले . त्यांना जिल्ह्यात न्याय देण्याचे काम केले. पण सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडीमुळे काम करणे शक्य असे म्हणत आपल्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाला कोकणात धक्का बसल्याचे मानले जात आहे. अशातच वैभव नाईक देखील शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या गोगावले यांच्या दाव्याने खळबळ उडवून दिली आहे. यामुळे येत्या काही दिवसात नाईकही ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का? हे आता पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.