Kolhapur News, 13 May : गडहिंग्लज तालुक्यातील पूर्व भागात जिल्हा बालकल्याण समितीकडून विवाह सोहळा रोखण्यात आला. कोतवाल म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या शिक्षक मुलाशी अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
बालकल्याण समितीकडून तात्काळ या ठिकाणी भेट देत मुलीची सुटका केली. धक्कादायक बाब म्हणजे या विवाह सोहळ्याला आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान या कारवाईनंतर मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. या प्रकारामुळे सीमाभागात खळबळ उडाली आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील पूर्व भागातील एनेचवंडी गावात बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा बाल कल्याण समितीच्या हेल्पलाईन नंबरवर मिळाली होती. एका गावातील कोतवालाचा मुलगा पंचक्रोशीतील मोठ्या गावातील शाळेत तासिका तत्त्वावर शिक्षक काम करत होता व त्याच शाळेतील एका अल्पवयीन मुलीशी त्याचा विवाह निश्चित झाला होता.
सोमवारी दुपारी १२:२६ वा. अक्षता होत्या. तत्पूर्वी बाल कल्याण समितीची एक टीम सोहळ्यास्थळी पोहचली होती. या टीममध्ये पर्यवेक्षक जुबेर शिकलगार, भाग्यश्री गावडे, अस्मिता पोवार, राजश्री दळवाई यांचा समावेश होता. शिवाय सहायक फौजदार अशोक पाटील यांच्यासमवेत होते.
दरम्यान, अक्षतारोपणा वेळ येताच नवरदेव अक्षतारोपणासाठी विवाहवेदीवर हजर होता. मात्र नवरी मुलगी ही अद्याप आपल्या खोलीत असल्याने तिची भेट समितीच्या सदस्याने घेतली. तिची विचारपूस केल्याने लग्नाच्या १८ वर्षे वयापेक्षा तिचे वय २ महिने १० दिवसांनी कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही बाजूच्या नातेवाइकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीची माहिती देऊन नियोजित विवाह रोखण्यात आला.
जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुहास वाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी मात्र अक्षतारोपणासाठी जमलेल्यांसह वधु आणि वर पक्षातील मंडळींची घाबरगुंडी उडाली. धक्कादायक बाब म्हणजे या विवाह सोहळ्याला आजी- माजी जि.प. आणि पं.स. सदस्यांसह विविध राजकीय पक्ष- गटांचे प्रमुख व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मंडळीदेखील उपस्थित होते.
मात्र प्रकार लक्षात येताच भटजीसह मान्यवरांनीही मंडपातून पळ काढला. बेकायदेशीर गोष्टींची माहिती शासनाला देण्याची जबाबदारी असणाऱ्या कोतवालानेच ही चूक कशी केली? याचीच चर्चा गडहिंग्लजसह जिल्हयात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.