Kolhapur News, 31 Oct : गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघ ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने या मतदारसंघातील चुरस वाढली आहे. यावेळी पुनर्रचना झालेल्या या मतदारसंघातून वसगडे, सांगवडे ही गावे वगळली असून गांधीनगरचे चार प्रभाग या मतदारसंघात समावष्ट केले आहेत.
करवीर पूर्वमधील हा महत्त्वाचा मतदारसंघ असल्याने आमदार सतेज पाटील गट आणि महाडिक गट अशीच पारंपरिक लढत याठिकाणी पुन्हा पाहावयास मिळणार आहे. काँग्रेस आणि भाजपच्या तिकिटावर कोण उमेदवार असणार? हीच एक उत्सुकता लागून राहिली आहे. आता उमेदवारी देताना नेत्यांची कसोटी लागणार आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेसह दोन्ही पंचायत समित्या जिंकल्या होत्या. गडमुडशिंगी, वळिवडे, चिंचवाड, न्यू वाडदे ही गावे आणि गांधीनगरचे चार प्रभाग असा हा मतदारसंघ झाला आहे.
आजपर्यंतच्या मागील चारही निवडणुकांत काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. मागील निवडणुकीत कमी मतदार असलेल्या सांगवडेतील वंदना विजय पाटील यांना उमेदवारी देऊन आमदार सतेज पाटील यांनी धक्का दिला होता.
त्या तूलनेने मोठे गाव असलेल्या गडमुडशिंगीतून भाजपकडून महाडिक गटाच्या रुपाली तानाजी पाटील यांनी लढत दिली होती, तर शिवसेनेकडून वळिवडेतील अश्विनी राजगोंडा वळिवडे यांनी लढत दिली होती. या लढतीत सतेज पाटील गटाने बाजी मारत जिल्हा परिषदेसह दोन्हीं पंचायत समित्या जिंकल्या होत्या. त्यानंतरच्या आठ वर्षात राजकारण बरेचसे बदलले आहे.
त्यावेळचे प्रतिस्पर्धी आताचे समर्थक बनले आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेत वसगडे, सांगवडे ही गावे गोकुळ शिरगाव मतदारसंघात गेली आहेत. गांधीनगर आणि न्यू वाडदे या पाचही गावांत सतेज पाटील गटाकडे सरपंचपद आहे., वळिवडेतील सरपंच सतेज पाटील गटाच्या असल्या, तरी स्थानिक आघाडीत महाडिक गटही सत्तेत आहे.
चिंचवाडला अपक्षांची मोट बांधून सत्ता स्थापन झाली आहे. गांधीनगर आणि गडमुडशंगी येथील सरपंचांनी महाडिक गटातून निवडून येऊन नंतर सतेज पाटील गटात प्रवेश केला आहे. गडमुडशिंगीत १५ वर्षे सत्ता तानाजी पाटील यांच्या गटाकडे आहे सर्व राजकीय गटातटांच्या राजकारणात सत्तेचा सारीपाट कधी इकडे, तर कधी तिकडे झुकत आहे. निर्विवाद लोकमत ठामपणे कोणीही सांगू शकणार नाही, अशी परिस्थिती आहे, तरीही नेत्यांनी दिलेल्या उमेदवारीवरच बरेचसे अवलंबून आहे.
वळिवडे आणि चिंचवाडसारख्या गावांना २०१९ आणि २०२१ अशी दोन वर्षे महापुराने फटका दिला. यावेळी झालेली मदत गावकरी लक्षात ठेवून आहेत. गांधीनगर व्यापारपेठ सोडली, तर सर्व गावे ही शेतीप्रधान गावे आहेत. वाढत्या नागरिकरणाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विधानसभेतील विजय हा भाजपसाठी जमेची बाजू आहे, तर झालेल्या पराभवामुळे आत्मचिंतन करून पुन्हा उभारी घेण्याची संधी काँग्रेसकडे आहे. सध्या दोन्ही बाजूचे कार्यकर्ते सावध पवित्रा घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.