
Solapur, 08 July : सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा विधानसभेवर निवडून गेलेले (स्व.) गणपतराव देशमुख हे राजकारणातील निःस्वार्थी आणि समाज सेवेसाठी वाहून घेतलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. तोच वारसा त्यांचे नातू आणि सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख पुढे चालवत आहेत. आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा करत डॉ. बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या पत्नी डॉ. निकिता देशमुख हे दांपत्य विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा रुजू करत आहेत. घरात तब्बल 60 वर्षे आमदारकी, स्वतः आमदार असूनही डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या साधेपणाची चर्चा वारीत होताना दिसून आली.
सांगोल्याच्या देशमुख घराण्याकडे तब्बल 12 वेळा आमदार आलेली आहे. स्वतः गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) हे 11 वेळा सांगोल्यातून निवडून आले आहेत, या वेळी त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे सांगोल्यातून विधानसभेवर निवडून आहेत. एकदा निवडून आलेला नगरसेवकही भपकेबाजी आणि चमकोगिरीत कमी नसतो. पण तब्बल 60 वर्षे घरात आमदारकी असूनही सांगोल्याचे देशमुखांनी आपला साधेपणा जपला आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरातील वारकरी मोठ्या भक्ती भावाने पंढरपूरच्या दिशेने चालत येत असतात. यात सांगोल्यांकडून येणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) आणि त्यांच्या मित्र मंडळींनी सांगोला येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. डॉक्टरांनी त्या ठिकाणीही काही वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. त्या ठिकाणी वारकऱ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब देशमुख हे हृदयविकार तज्ज्ञ असून त्यांच्या पत्नी डॉ. निकिता देशमुख ह्या स्त्री रोगतज्ज्ञ आहे. राजकारणात असूनही कोणताही बडेजाव न बाळगता या दांपत्याने पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेला गेली तीन वर्षांपासून वाहून घेतले आहे.
डॉ. निकिता देशमुख आणि आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पहिल्यांदा वाखरी येथे सरकारच्या आरोग्य शिबिराच्या कॅम्पमध्ये वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणी केली. त्यांची पत्नी डॉ. निकिता यांनी महिला वाकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली. सरकारच्या वतीने गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले.
एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील तीन रस्ता येथे सरकारच्या वतीने आरोग्य शिबिर भरविण्यात आले होते. त्या शिबिरातही देशमुख दांपत्याने आरोग्य सेवा बजावली. या ठिकाणी त्यांना सांगोला तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, महिला वर्कर, आरोग्य सेविका यांची मोलाची मदत मिळाली. दोन दिवस देशमुख दांपत्याने वारकऱ्याची आरोग्य सेवा करत आपली सेवा पांडुरंगाची चरणी रूजू केली.
प्रसंगावधान दाखवून जखमींवर उपचार
दरम्यान, आषाढी वारीच्या दिवशी महूद-पंढरपूर रस्त्यावर न्यू सातारा कॉलेजच्या समोर एक अपघात झाला होता. त्यावेळी त्याच रस्त्याने जाणारे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी प्रसंगावधान दाखवून जखमींवर रस्त्यावरच प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी पंढरपुराला तातडीने पाठवून दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.