

Kolhapur Gokul Political News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस मधील खदखद बाहेर आली होती. गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी महायुतीमध्ये ए वाय पाटील यांना घेऊ नये, आमच्या शिवाय दुसऱ्यांचा विचार झाल्यास आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा दिला होता.
मात्र डोंगळे यांच्या या इशाऱ्याला भीक न घालता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले आहे. आज ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाठिंबा दिला आहे. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब असुर्लेकर यांच्या उपस्थितीत पाठिंबा स्वीकारण्यात आला. ए. वाय. पाटलांचा हा निर्णय काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना धक्का मानला जात आहे.
'गोकुळ'च्या निवडणुकीत राधानगरी तालुक्यातून महायुतीत आमच्याशिवाय अन्य पर्यायांचा विचार झाल्यास आम्हाला गृहीत धरू नका. तालुक्यातील मतांची विभागणी टाळण्यासाठी ए. वाय. यांना घेतले जात असेल तर हवी तेवढी मते आम्ही देण्यास समर्थ आहोत; मग, नेते हवेतच कशाला? अशा शब्दांत गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनीं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना इशारा दिला होता. ए वाय पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यासाठी मंत्री मश्रीफ यांचे निकटवर्तीय आणि जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी विशेष प्रयत्न केले होते.
काही दिवसांपूर्वी ए. वाय. हे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या भेटीगाठीत त्यांच्यासोबत होते; पण ए. वाय. यांनी दुसरा विचार केला तर राधानगरीत मतांची विभागणी होईल, यासाठी त्यांना महायुतीत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घडामोडींचे पडसाद आज कासारवाडा मेळाव्यात उमटले होते.
डोंगळे यांनी आपली भूमिका करताना थेट इशारा देताना तालुक्यातून महायुतीत फक्त आमचाच विचार झाला पाहिजे, अन्य पर्यायांचा विचार झाल्यास आम्हाला गृहीत धरू नका, असे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. दरम्यान ढोबळे यांच्या या इशाराकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ यांनी बेदकल केल्याचे दिसून येते.
ए. वाय. पाटील कां महत्वाचे
डोंगळे आणि ए वाय पाटील यांच्यामध्ये राधानगरी तालुक्याचे नेतृत्व कोण करायचे यावरून अंतर्गत स्पर्धा सुरु आहे. मात्र ए वाय पाटील हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते एसटी महामंडळाचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. शिवाय गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ते कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक आहेत.
तर सध्या मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. शिवाय राधानगरी तालुक्यात त्यांची मोठी ताकद आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ए वाय पाटील यांनी 200 ठराव गोळा केले आहेत. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांना महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक जागा मिळवण्यासाठी ए वाय पाटील महत्त्वाचे ठरू शकतात. दरम्यान गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर न बोलणे पसंत केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.