Gokul Election: गोकुळची सत्ता 'खिशात घेऊन फिरणाऱ्या' दोन दिग्गजांचा पराभव: अरुण डोंगळे, विश्वास पाटलांचं कुठं चुकलं?

Gokul election 2026: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांचा पराभव झाला. अंतर्गत मतभेद, वादग्रस्त वक्तव्ये, राजकीय बदल आणि मतदानातील घसरण चर्चेचा विषय ठरली.
Gokul election results saw veteran leaders Arun Dongale and Vishwas Patil suffer defeats
Gokul election results saw veteran leaders Arun Dongale and Vishwas Patil suffer defeatsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul Election Results: ‘गोकुळ’च्या राजकारणात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दबदबा निर्माण करताना सत्तेच्या चाव्या स्वतःजवळ ठेवलेले माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील व अरुण डोंगळे यांच्यावर या निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली. आपण म्हणजे ‘गोकुळ’ आणि आम्ही जिकडे तिकडेच विजय या भ्रमात असलेल्या या दोन नेत्यांना ठरावदारांनी या निवडणुकीत जागा दाखवली.

पाच वर्षांपूर्वी डोंगळे व पाटील यांनी पहिल्यांदा बंडांचा झेंडा फडकवून त्यावेळी सत्तारूढ गटाचे नेते असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक व स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांची साथ सोडून आमदार सतेज पाटील यांना साथ दिली होती. या दोघांशिवाय आणखी चार संचालक विरोधकांना मिळाले.

त्यावेळी महाविकास आघाडीची असलेली सत्तेची ताकद, मंत्री पदाचा दबदबा या जोरावर आमदार पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्तांतर घडवले. या सत्तांतरात डोंगळे-आबाजी या जोडगोळीचाच मोठा वाटा होता. या निवडणुकीत महायुतीची सर्वस्वी भिस्त या दोघांवरच होती. त्यामागे त्यांच्या मागे असलेल्या ठरावदारांची ताकद हे मुख्य कारण होते.

सत्ता आल्यानंतर मात्र कुरबुरी झाल्या, या कुरबुरींनी टोक गाठलं ते चौथ्या वर्षी. नेतृत्वाला थेट आव्हान देण्याची परंपरा असलेल्या डोंगळे यांनी ठरलेल्या मुदतीत राजीनामा न देता मंत्री मुश्रीफ यांनाच आव्हान दिले. त्यातून या दोघांत तणाव निर्माण झाला. काही दिवसांनी त्यांनी महायुतीचा अध्यक्ष व्हावा म्हणून राजीनामा देत नसल्याचे कारण सांगितले.

Gokul election results saw veteran leaders Arun Dongale and Vishwas Patil suffer defeats
Gokul Election Results: ‘गोकुळ’मध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांनी काढला एकमेकांचा काटा; प्रचारात एकीचा देखावा, मतदानात रंगला सूडाचा खेळ

शेवटी महायुतीचा अध्यक्ष करण्याच्या अटीवर त्यांनी राजीनामा दिला. प्रत्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर ‘गोकुळचा बाप आबाजीच’ असे वक्तव्य करून डोंगळे यांनी एकच खळबळ उडवून दिली. डोंगळेंचे हे वादग्रस्त वक्तव्यही या दोघांच्या पराभवाचे कारण ठरले. त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न डोंगळेंनी केला; पण ते लोकांच्या पचनी पडले नसल्याचे निकालावरून दिसले.

विश्‍वास पाटील यांनाही ‘मी म्हणेल तसे’ ही भूमिका महागात पडली. महाडिकांची साथ सोडून ते विरोधात गेले, त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला. प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांचे हे सत्तांतरही त्यांचा पराभव वाचवू शकले नाही. या दोघांच्या विरोधात समाजमाध्यमांवर भरपूर अपप्रचार करणाऱ्या रील्स व्हायरल झाल्या होत्या. त्याचाही परिणाम निकालात दिसला.

विश्‍वास पाटील यांना दुसरा धक्का

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विश्‍वास पाटील यांचे पुत्र शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात होते. मतदानाच्या आदल्या दिवशी ‘त्यांना पाडा’ असा माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा फोन कॉल व्हायरल झाला आणि त्यात त्यांच्या मुलाचा पराभव झाला. आज ‘गोकुळ’च्या निवडणुकीत त्यांचा स्वतःचा झालेला पराभव हा त्यांना दुसरा धक्का बसला.

Gokul election results saw veteran leaders Arun Dongale and Vishwas Patil suffer defeats
Satara NCP : अजितदादांनंतर महायुतीत गृहित धरलं जातंय! राष्ट्रवादीच्या बैठकीला कार्यकर्त्यांची दांडी; मकरंद पाटलांसमोर खुर्च्या रिकाम्या

एक नंबरवरून थेट पराभव

‘गोकुळ’च्या आतापर्यंतच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांत डोंगळे व विश्‍वास पाटील हे झालेल्या मतदानात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकांची मते घेऊन विजयी होत होते. यावेळी हे दोघे तर पराभूत झालेच; पण खुल्या गटातील ४० उमेदवारांत पाटील २२ व्या, तर डोंगळे ३१ व्या क्रमांकावर फेकले गेले. पाटील हे २२ मतांनी, तर डोंगळे तब्बल १६५ मतांनी पराभूत झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com