

Kolhapur News, 14 Nov : अत्यंत नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष झाला. अध्यक्षपदाची निवड पार पडली असली, तरी गोकुळच्या राजकीय पटावर गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या घडामोडींमध्ये एका संचालकाची कामगिरी चर्चेत आली आहे.
संस्था पात्र-अपात्रतेच्या निकालापासून प्रत्येक घडामोड मंत्र्यांपर्यंत पोहोचवणारा टिप्सर संचालक ते अध्यक्ष निवड झाल्यानंतर अगदी शुक्रवारच्या घडामोडींपर्यंत अध्यक्षांनी काय बोलावे आणि संचालकांनी कुठे बसावे, अशी विनाकारण चर्चा घडवून आणत पुढे पुढे करणाऱ्या एका संचालकाची धडपड चांगलीच चर्चेत आली आहे.
गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून संस्था पात्र-अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात गेला. न्यायालयाच्या निर्णयापासून ते दुग्ध निबंधक अधिकाऱ्यांकडून येणारे आदेश एका मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या संचालकाकडे देण्यात आली होती का? की त्यांनी ती स्वतःहून घेतली होती? जर ती जबाबदारी देण्यात आली होती, तर आपल्याच पक्षातील मंत्र्यांना प्रत्येक घडामोडीची बातमी वेळेवर पोहोचवण्याची जबाबदारी या संचालकाची होती.
मात्र, आपल्या पक्षाव्यतिरिक्त दुसऱ्याच पक्षाच्या मंत्र्यांपर्यंतही या घडामोडी पोहोचवण्यासाठी इतकी धडपड का, अशी चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकारणात पाहायला मिळाली. हा संचालक म्हणजे मागील सत्ताधाऱ्यांच्या काळात अध्यक्ष होण्यासाठी ज्यांची धडपड चांगलीच चर्चेत आली होती, तेच.
मात्र, घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे संधी हुकलेल्या या संचालकाने आता मात्र गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष पाच वर्षे राहील, अशी शक्यता आहे. सुरुवातीला हे अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळाले, तर उर्वरित काळातील अध्यक्षपद भाजप किंवा शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत किंवा पाच वर्षांच्या कार्यकाळात कधीही आपल्याला अध्यक्षपदाची संधी मिळेल, अशी आशा संबंधित संचालकाला आहे.
त्यामुळे या संचालकाची धडपड शुक्रवारी पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली. एका वृत्तवाहिनीला जाहिरात दिल्याचा आरोप याच संचालकावर समविचारी आघाडीतील नेते आणि एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. शुक्रवारीदेखील या संचालकाची धडपड इतर संचालकांच्या डोळ्यांत दिसून आली. शुक्रवारी गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील ताराबाई पार्क येथील कार्यालयात दाखल झाले होते. महायुतीचे संचालकदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते. शिवाय, पुढे पुढे करण्यासाठी धडपडणारे संचालकही अग्रभागी होते.
अगदी नूतन अध्यक्षांनी माध्यमांसमोर काय बोलावे किंवा बोलू नये, याच्या सूचना देताना हे संचालक दिसून आले. इतकेच नव्हे, तर सायंकाळी झालेल्या जिल्हा बँकेच्या बैठकीत अध्यक्षांनी दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत काय बोलावे आणि काय बोलू नये, तसेच नूतन संचालकांनी कुठे बसावे, याबाबतही सल्ले देताना ते पाहायला मिळाले. संचालकांच्या या धडपडीची चर्चा इतर संचालकांमध्ये चांगलीच रंगली होती. काही जणांनी या संचालकाची सुरू असलेली धडपड पाहून खासगीत इतरांपुढे नाराजीही व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.