

Pune News, 14 Nov : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, विलीनीकरणाच्या चर्चेपेक्षा आता पक्षाचे नेतृत्व कोणाकडे राहणार? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः राष्ट्रीय अध्यक्षपदावरून दोन्ही गटांमध्ये एकमत होत नसल्याने विलीनीकरणाचा मार्ग अडचणीत आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे गेल्यास पक्षावरील नियंत्रण पुन्हा त्यांच्या हातात जाईल, अशी धास्ती दुसऱ्या गटाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दोन्ही गट एकत्र येण्याची राजकीय इच्छा असली, तरी पक्षाचे नेतृत्व कोण करणार, यावरच विलीनीकरणाचे भवितव्य अवलंबून असल्याचे मानले जात आहे. अध्यक्षपदाचा तिढा सुटल्याशिवाय एकत्र येण्याच्या प्रक्रियेला गती मिळणे कठीण असल्याचे राजकीय जाणकारांचं मत आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये यासंदर्भात काही राजकीय खलबते होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा नियोजित आहे. या दौऱ्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्रिकरणाबाबत काही निर्णय व्हावा, अशी अपेक्षा काही राजकीय स्तरांतून व्यक्त केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमित शाह यांचा पुणे दौरा आणि मोदी यांचा बारामती दौरा या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या राजकारणातील पुढील हालचाली महत्त्वाच्या ठरणार आहेत.
मात्र, विलीनीकरणाच्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने नकार दिला जात आहे. खासदार (राष्ट्रवादी शरद पवार) सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनीही या चर्चांचे खंडन केले आहे. गेल्या आठवड्यापासून तथाकथित सूत्रांच्या हवाल्याने विलीनीकरणाच्या बातम्या दिल्या जात आहेत.
मात्र कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'ना औपचारिक, ना अनौपचारिक; ना आमच्या बाजूने, ना त्यांच्या बाजूने', अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे एका बाजूला विलीनीकरणाच्या चर्चांचे खंडन होत असताना दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचे दिसत आहे. दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चां या चर्चाच राहणार की प्रत्यक्षात काही निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.