

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर चेअरमन निवडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोकुळमध्ये चार संचालकांची शासननियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला राजर्षी शाहू समविचारी आघाडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याचबरोबर या निर्णयाविरोधात काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचा व्यापक ‘संघर्ष मोर्चा’ काढण्यात आला.
या मोर्चात शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी, सांगली जिल्ह्यातील कडेगावचे आमदार विश्वजीत कदम आणि विवेकानंद पाटील यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. “कोल्हापूरच्या जनतेला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नका,” असा इशारा विवेकानंद पाटील यांनी दिला. गोकुळमधील या घडामोडींमागे कोल्हापुरातून नाकारलेला एक मंत्री असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा मंत्री कोल्हापुरात राहत नसून पुण्यात राहतो, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
विवेकानंद पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला या विषयात पडायचे नाही. मग एका रात्रीत अध्यादेश कसा काय पारित झाला? आमच्या लोकांनी काही आमदारांना निवडून देऊन विधानभवनात पाठवले; मात्र आता ते कोरमचे कौतुक सांगत आहेत. साहेब, घोडमैदान लांब नाही. तुमचा कोरम २९ लाच पूर्ण केला जाईल. गेल्या दहा ते पंधरा दिवसांत गोकुळमध्ये काय खेळ सुरू आहे, हे सर्वांनी पाहिले आहे.” “शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझे मत स्पष्ट आहे. मला पक्षाशी देणेघेणे नाही. कोल्हापूरच्या जनतेने स्वाभिमानी बंटी पाटील यांच्या पॅनेलला बहुमत दिले आहे. त्यामुळे चेअरमन त्यांच्याच पॅनेलचा झाला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात
माजी खासदार राजू शेट्टी यांनीही गोकुळच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. गोकुळमधील सत्तासंघर्षावर भाष्य करताना त्यांनी सहकार क्षेत्राचा इतिहास आणि स्वीकृत संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला. शेट्टी म्हणाले, “एवढ्या मोठ्या संख्येने जनता एकवटली आहे. पाच हजार ठरावधारकांना मॅनेज करून गोकुळवर कब्जा करता येईल, असे त्यांना वाटले होते. मात्र त्यात यश आले नाही. कारण हे कोल्हापूर आहे. त्यानंतर कोरमचे नाटक करून बैठका पुढे ढकलण्याचा डाव खेळण्यात आला. आता रडीचा डाव सुरू आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना सहकार कधीच कळला नाही.”
वैकुंठराव मेहता, विठ्ठलराव विखे-पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांसारख्या नेत्यांनी सहकाराची पाळेमुळे रोवली, असे सांगत शेट्टी यांनी स्वीकृत संचालकांच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले, “सहकारी संस्थांमध्ये स्वीकृत संचालकांची तरतूद निर्णयप्रक्रियेला मदत व्हावी, कायदेशीर सल्ला मिळावा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी करण्यात आली. मात्र आजपर्यंत स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार नव्हता. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही अशी पद्धत नव्हती. गुजरातमध्ये २०२० मध्ये असाच प्रयत्न झाला होता; मात्र तो हाणून पाडण्यात आला.”
या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे सांगत शेट्टी यांनी न्यायालयीन प्रक्रियेवरही भाष्य केले. “कोर्टाने राजकीय दबावाला बळी पडून निर्णय दिला, तर लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडू शकतो,” असे ते म्हणाले. कोल्हापूरच्या जनतेने यापूर्वीही अनेक आंदोलनांतून आपली ताकद दाखवून दिल्याचे सांगत शेट्टी यांनी टोलविरोधी आंदोलन, अदानी पॉवर प्रकल्प आणि माधुरी हत्तीच्या मुद्द्यांचा उल्लेख केला. “कोल्हापूरकरांनी ठरवले तर ते करून दाखवतात. हा राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे. गोकुळच्या निवडणुकीचे नोटिफिकेशन पुन्हा वाचावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
विश्वजीत कदमांचा बहुमताच्या आकड्यावरून सवाल
या मोर्चातील सभेत आमदार विश्वजीत कदम यांनीही शासनाच्या निर्णयावर टीका केली. समविचारी आघाडीकडे बहुमताचा आकडा १३ नसून त्यापेक्षा अधिक असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव असल्यामुळे १३-१२ असा निकाल जाहीर करावा लागल्याचा आरोपही त्यांनी केला. कदम म्हणाले, “पहिल्यांदा रडीचा डाव तिथेच का खेळला? हा जनसागर आणि हा उठाव शासनस्तरावर घेतलेल्या निर्णयाविरोधात आहे. गोकुळमध्ये कोरमचा मुद्दा पुढे करून सभा होऊ दिली नाही. सरकारला एक कायदा मंजूर करायचा होता, म्हणूनच हा सगळा प्रकार करण्यात आला.”
शासननियुक्त सदस्यांच्या माध्यमातून मागच्या दाराने गोकुळची सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. “शासननियुक्त सदस्य आपल्या विचारांचे असतील, तर त्यांना मागच्या दाराने आत घेऊन गोकुळची सत्ता ताब्यात घेण्याचे काम केले जात आहे,” असे कदम म्हणाले. मुख्यमंत्री गोकुळचा विषय कोल्हापूरचा असल्याचे सांगत असताना दुसरीकडे दिल्लीतील वकील का आणला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सतेज पाटील यांच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरची जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचेही कदम यांनी म्हटले. गोकुळमधील शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा आता न्यायालयात पोहोचला असून, दुसरीकडे रस्त्यावरचा संघर्षही तीव्र झाला आहे. त्यामुळे चेअरमन निवडीपूर्वी गोकुळमधील सत्तासंघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.