

Kolhapur News : गोकुळ दूध संघात चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर कोल्हापूरसह संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेससह विरोधक आक्रमक झाले असून आमदार सतेज पाटील यांनीही आता थेट मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. ते आज (ता. ५) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.
दुसरीकडे, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गोकुळच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे. त्यावर महायुतीच्या नेत्यांकडूनही जोरदार पलटवार सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. लोकशाही अबाधित राहावी आणि गोकुळचा कारभार सुरळीत चालावा, यासाठीच चार शासननियुक्त सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून आधीच राजकीय पेच निर्माण झाला असताना चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीच्या निर्णयाने वाद आणखी चिघळला आहे. या नियुक्त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याने अध्यक्ष निवडीचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
या मुद्द्यावर काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावरील ‘एक्स’ खात्यावरून भूमिका मांडत भाजपवर निशाणा साधला. गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी भाजपचा पराभव केला. मात्र, निवडणुकीनंतर नियम बदलून चार संचालकांची नियुक्ती करत संचालकांचे संख्याबळ १२ वरून १६ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा दूध उत्पादकांच्या मतांचा अपहार असून जनादेशात भेसळ करण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली. तसेच सत्ता टिकवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जात असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. दूध उत्पादकांची मते हिरावून घेणाऱ्यांना शेतकरी विसरणार नाहीत, असा इशाराही त्यांनी आपल्या पोस्टमधून दिला.
दरम्यान, महायुतीकडूनही विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले जात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तसेच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गोकुळच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेला देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘राहुल गांधींना सर्वत्र व्होट चोरीच दिसते; मात्र त्यांना गोकुळ समजलाच नाही. कोरमशिवाय सभा होऊ शकत नाही,’ असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना मुश्रीफ यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. अध्यक्ष निवडीसाठी कोणालाही अडवण्यात आलेले नाही. गैरसमजातून विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. सतेज पाटील यांना आम्ही अडवलेले नाही, त्यांनी त्यांचा अध्यक्ष करावा, असे खुले आव्हानही त्यांनी दिले. गोकुळमध्ये अनुभवी व्यक्तींचीच निवड केली जाईल आणि तज्ज्ञ संचालकही नियुक्त केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच याचवेळी त्यांनी आपला मुलगा नविद मुश्रीफ हे गोकुळच्या अध्यक्ष पदाच्या रेसमध्ये नसल्याचेही जाहीर करून टाकलं आहे.
‘सतेज पाटलांनी विष कालवले’
गोकुळमधील वाद हा केवळ राजकीय नसून त्यामागे वर्चस्वाची लढाई असल्याचे मुश्रीफ यांनी मान्य केले. आमच्यामध्ये वर्चस्वाच्या मुद्द्यावरून संघर्ष झाला, हे सत्य आहे. मात्र, या वादातून सभासदांमध्ये विष कालवण्याचे काम सतेज पाटील यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला. सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून विरोधात प्रचार केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. मुश्रीफ यांनी आपल्या मुलाच्या विरोधात सोशल मीडियावर जातीयवादी पोस्ट करण्यात आल्याचा आरोप केला. गोकुळच्या राजकारणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राजू शेट्टींना आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन
यावेळी मुश्रीफ यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या ऊसदर आंदोलनावरही भाष्य केले. राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे दरवेळी कोल्हापूर जिल्ह्यालाच वेठीस धरले जाते. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील साखर कारखाने सुरू असताना त्यांच्या आंदोलनामुळे कोल्हापूरमधील शेतकरी, कारखानदार आणि कामगारांचे हाल होत असल्याचे ते म्हणाले. दिवाळीच्या तोंडावर राजू शेट्टी यांनी आंदोलन स्थगित करावे. कारखानदारांना जितके देणे शक्य आहे, तितके देण्याची आमची तयारी आहे, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. साखरेचे दर वाढल्याचा फायदा कारखानदारांपेक्षा व्यापाऱ्यांना अधिक झाला आहे, याची कल्पना राजू शेट्टी यांनाही आहे, असे त्यांनी नमूद केले.
ऊसतोडीसाठी बाहेरील जिल्ह्यांतून आलेले कामगार आंदोलनामुळे परत जाण्याची शक्यता असल्याची चिंता मुश्रीफ यांनी व्यक्त केली. त्यामुळे ऊसतोडीचे काम विस्कळीत होऊन शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र, या आंदोलनावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून सतेज पाटील आणि महायुतीतील संघर्ष सुरू असतानाच मुश्रीफ यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गोकुळचा अध्यक्ष कोण होणार आणि ऊसदर आंदोलनावर काय तोडगा निघणार, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.