Solapur, 14 November : अक्कलकोटमधील विकासकामांच्या मुद्द्यावरून सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. ‘भाजपच्या त्रासाला आणि त्यांच्या आमदाराला तुम्ही वैतागला आहात, हे आमदार फक्त ‘जीआर’वरचे आहेत. बाकी अस्तित्वात काहीच दिसत नाही, असा आरोप प्रणिती शिंदेंनी केला आहे. त्याला सचिन कल्याणशेट्टींनी उत्तर देताना प्रणिती शिंदेंनी एकदा मुंबईतून अक्कलकोटमध्ये यावं. अक्कलकोटमधील विकास मी त्यांना फिरवून दाखवेन’ असे आवाहन केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपच्या त्रासाला आणि त्यांच्या आमदाराला तुम्ही वैतागला आहात, हे आमदार फक्त ‘जीआर’वरचे आहेत. बाकी अस्तित्वात काही दिसत नाही. बाराशे-तेराशे कोटींचा निधी हा फक्त कागदावर आहे. मागच्या 5 वर्षांत अक्कलकोट तालुक्यात काहीच विकासकामे झालेली नाहीत, त्यामुळे भाजपकडे माणुसकी आणि संस्कृती नाही.
एकीकडे महिलांवर बलात्कार होतात, चार वर्षांच्या लहान मुलीला पण सोडत नाहीत आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांना आमिष दाखवून मत विकत घेण्याचं काम भाजप करत आहे. त्यामुळे त्यांना कधीच माफी नाही. भाजपने साम, दाम, दंड, ईडी, सीबीआय वापरलं तरी विजय हा काँग्रेस आणि लोकशाहीचा होणार आहे. आता कोणीही किंगमेकर नसून जनता जनार्दन किंगमेकर ठरणार आहे, असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी व्यक्त केला.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या टीकेला भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले, प्रणिती शिंदे यांना विनंती आहे की, त्यांनी मुंबई सोडून एकदा अक्कलकोटमध्ये यावं. अक्कलकोटमध्ये किती काम झाले, हे बघण्यासाठी मी स्वतः त्यांना घेऊन फिरतो.
कल्याणशेट्टी म्हणाले, प्रणितीताई यांची अडचण आहे की, त्या मुंबईत राहत असल्यामुळे मतदारसंघातील विकासाची कामं त्यांना माहिती नाहीत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी काहीतरी भाषण करायचं म्हणून केल असेल. मात्र, काँग्रेसच मूळ दुखणं ही 'लाडकी बहीण' आहे.
खासदार शिंदे यांच्याकडून फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विकासाचं नवीन परफेक्शन भाजपकडून सेट करण्यात आलं आहे. भाजपच्या काळात कधीही दंगली झाल्या नाहीत. उलट काँग्रेसच्या काळात दंगली आणि बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे खासदार शिंदे निवडून येऊन विकासाबाबत काही बोलू शकल्या नाहीत, असेही त्यांनी नमूद केले
सध्या दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघात ताळमेळ नसलेली आघाडी दिसून येत आहे, त्यामुळे निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे, असा विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.