Solapur, 14 November : माढ्यातील पाठिंब्यावरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबात वाद पेटला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंतांनी रणजित शिंदेंंना दिलेला पाठिंबा वैयक्तिक असल्याचे सांगून पुतणे अनिल सावंत यांनी माढ्यात अभिजीत पाटील यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. मात्र, पुतण्याचा दावा खोडून काढताना शिवाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मोहिते पाटील कुटुंबीयांवर आरोप केले. माढ्यातील सावंत कुटुंबीय हे राज्यातील मोठं कुटुंब आहे. सावंत घराणे फोडण्यासाठी अकलूजच्या मोहिते पाटलांनी काहींना सुपारी दिली आहे, असा हल्ला शिवाजी सावंतांनी केला.
माढ्यात अभिजीत पाटील यांच्या पाठीशी सावंत परिवार असल्याचे पंढरपुरात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत (Anil Sawant) यांनी जाहीर केले होते. त्यावर शिवाजी सावंत यांनी माढ्यात पत्रकार परिषद घेऊन पुतण्या अनिल सावंतांना जोरदार टोला लगावला आहे.
माढा मतदारसंघात (Madha Constituency) रणजितसिंह शिंदे यांच्याच पाठीशी सावंत परिवार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच पंढरपूर-मंगळवेढ्यात शिवाजी सावंतांनी (Shivaji Sawant) पुतण्याच्या विरोधात भूमिका घेत सावंत कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांचे काम करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे माढ्यात आता शिवाजी सावंत आणि अनिल सावंत या काका पुतण्यांमध्ये राजकीय वॉर रंगले आहे.
माढा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील, महायुतीकडून माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे, तर अपक्ष म्हणून आमदार बननराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. या तिरंगी लढतीत अभिजीत पाटील यांनी बबनराव शिंदेंच्या विरोधात आव्हान उभे केले आहे.
दरम्यान, माढ्यातून महायुतीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिवाजी सावंत यांच्या ऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीनल साठे यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे संतापलेल्या शिवाजी सावंतांनी आपला पाठिंबा सावंत परिवाराचे राजकीय विरोधक असलेले आमदार बबनराव शिंदे यांचे चिंजीव रणजितसिंह शिंदे यांना दिला आहे.
माढ्यात रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा दिला असला तरी पंढरपुरात ते स्वतःच्या पुतण्याला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढणारे अनिल सावंत यांना पाठिंबा देतील, अशी शक्यता होती. मात्र, त्यांनी महायुतीचे उमेदवार समाधान आवताडेंना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे सावंत परिवारात फूट पडल्याचे दिसून येत आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.