
Satara, 10 March : विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. सर्वाधिक तीन जागा भारतीय जनता पक्षाच्या रिक्त झाल्या आहेत, त्यामुळे इच्छुकांची संख्याही सत्ताधारी भाजपकडेच मोठी आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी अनेकांना शब्द दिलेला आहे, त्यामुळे ते नेमके कोणाला संधी देतात, याची उत्सुकता असतानाच प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यातील युवा नेत्याबाबत मोठे विधान केले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी दिल्ली आणि राज्यातील नेत्यांना प्रस्ताव देतो, असा शब्द त्यांनी माथाडी कामगारांच्या शिष्टमंडळा दिला.
विधान परिषदेवर संधी देताना भाजप नेत्यांना प्रादेशिक समतोलही साधावा लागणार आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्दही पाळावा लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यातूनच माजी आमदार प्रशांत परिचारक, राम सातपुते, राजेंद्र राऊत इच्छूक आहेत. दुसरीकडे मूळचे सातारा जिल्ह्यातील आणि सध्या नवी मुंबईत वाशी येथे कार्यरत असणारे माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.
नरेंद्र पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. पाटील यांच्या विनंतीवरून माथाडी कामगारांच्या मेळाव्यांना त्यांनी हजेरी लावली आहे. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदही नरेंद्र पाटील यांच्याकडे फडणवीसांनी सोपवले होते. त्यामुळे फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या नरेंद्र पाटील हेही विधान परिषदेसाठी तीव्र इच्छूक आहेत.
दरम्यान नरेंद्र पाटील यांना विधान परिषदेवर संधी मिळावी, यासाठी माथाडी कामगारांचे एक शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटले. त्या शिष्टमंडळास बावनकुळे यांनी सकारात्मक उत्तर दिले. ते म्हणाले, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबतचा प्रस्ताव दिल्ली आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांकडे सादर करण्यात येईल. पाटील यांना विधान परिषदेवर घेण्याचा प्रयत्न करू, असा शब्दही त्यांनी शिष्टमंडळाला दिला.
माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी दोनच दिवसांपूर्वी माथाडी कामगारांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आली होती, त्यावेळी झालेल्या निर्णयानुसार युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महसूल मंत्री बावनकुळे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. त्या भेटीत बावनकुळे यांनी नरेंद्र पाटील यांना विधान परिषदेवर घेण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. याशिवाय पाटील यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी दिल्लीच्या दरबारात आणि महाराष्ट्राच्या नेत्यांकडे प्रस्ताव देण्याचे कबूल केले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.