
Solapur, 14 March : निवडणुकीत माझ्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या गेल्या, अपप्रचार करण्यात आला. राम सातपुतेंनी बंगला विकला, आता इथून निघून जाणार, असेही माझ्याबाबत बोललं गेलं. आता म्हणतात की किती दिवस राहणार आहे. मी या व्यासपीठावरून सांगतो की, माझं वय सध्या ३५ आहे, माणसाला शंभर वर्षांचं आयुष्य असतं. मी ११० वर्षे जगणार असून तोपर्यंत मी माळशिरस तालुक्यातच राहणार आहे, कुठेही जाणार नाही, त्यामुळे काही काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगत माजी आमदार राम सातपुते यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटील यांना चॅलेंज दिले आहे.
राम सातपुते (Ram Satpute) यांचा वाढदिवसानिमित्त तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात बोलताना माजी अमदार सातपुते यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटील यांना नाव न घेता आव्हान दिलं आहे.
माजी आमदार सातपुते म्हणाले, माळशिरसमध्ये (Malshiras) कामं करणं तसं तारेवरची कसरत आहे. पण, अंगात गोरगरिबांसाठी काम करण्याची रग होती. सर्वसामान्यांचं काम करण्यासाठी भाजपने मला पाठविले आणि त्या भावनेतून आपण काम केले पहिजे, या विचाराने काम करत राहिलो. पार्टीशी गद्दारी ही राम सातपुतेच्या रक्तात कधीच नाही. ज्या पार्टीने मला इथपर्यंत आणलं, ज्या संस्करातून घडलो, तो संस्कार मला सांगतो की गोरगरिबांसाठी काम केलं पाहिजे. आज मी आमदार नसलो तरी रोज एक तास मतदारसंघातील पेशंटच्या कामासाठी देतो. पुणे, मुंबईत माझे तीन ते चार आरोग्यसेवक आहेत. गोरगरिब रुग्णांची राहायची, जेवणाची व्यवस्था नसेल तर तीही आम्ही करतो.
राम सातपुतेंनी माणसं जोडायचा कारखाना मागील पाच वर्षांत माळशिरस तालुक्यात काढला आहे आणि त्यांची ही गर्दी आहे. आजही माझ्याकडे रोज सर्वसामान्य जनता येते. तालुक्यातील जनतेला आज पाश्चताप होतो आहे की, थोडक्यात रामभाऊ पडले. मी हिंदुत्वादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे, त्यामुळे दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखून काम करणारा मी कार्यकर्ता आहे, असा दावाही त्यांनी केला.
सातपुते म्हणाले, मला भेटण्यासाठी कुणाच्याही चिठ्ठीची गरज भासत नाही. मी थेट लोकांशी संपर्क ठेवणारा भाजपचा कार्यकर्ता आहे. पूर्वी डीपीसाठी पत्र पाहिजे असेल तर बंगल्यावर पाच पाच तास, पाच पाच दिवस जाऊन बसावं लागत होतं, पण त्यांना पत्रही भेटत नव्हतं. लोक म्हणतात, तिकडं पत्र भेटेपर्यंत आपल्याला डीपी बसतो आहे, इतकं आपलं काम फास्ट आहे.
गोरगरिब सामान्य माणसाला ज्याप्रमाणे चरक्यातून ऊस काढला जातो, तसं येथील प्रस्थापित नेतेमंडळी सर्वसमान्यांचं रक्त पिण्याचे काम करत आहेत. आपण कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. पण या विकृतीच्या विरोधात आपल्याला काम करायचं आहे. सर्वसामन्य माणसाला ढेकणासारखं रगडून रगडून मारायचं, ही जी विकृत प्रस्थापित मानसिकता आहे. त्याविरोधात विस्थापित सामान्य जनतेचा लढा आपण लढायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माळशिरसमधील सर्वसामान्य जनतेसाठी मी कामं केलं आहे, त्यामुळे येथील जनता आपल्यावर विश्वास ठेवते. इथल्या जनतेला पक्कं माहिती आहे की, राम सातपुते कधीही मॅनेज होणार नाही आणि तुम्ही बिनधास्त राहा. मी ज्या वेळी लढतो, तेव्हा संपूर्ण ताकदीनं लढतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.