

Ichalkaranji Garbage Tender: इचलकरंजी महानगरपालिकेच्या २२ कोटी रुपयांच्या कचरा उचलण्यासाठीच्या टेंडरसाठी आज विशेष सभा बोलावण्यात आली होती. महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत टेंडरला एकमताने मंजुरी देण्यात आली. मात्र, सभेला हाळवणकर गटाचे नगरसेवक, शिवसेना आणि शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी अनुपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा आवाडे-हाळवणकर गटातील राजकीय संघर्ष उघडपणे समोर आला. विशेष म्हणजे ही सभा अवघ्या दोन मिनिटांत संपल्याने दिवसभर त्याचीच चर्चा रंगली.
महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत टेंडरला उपस्थित सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. सभेला भाजपच्या आवाडे गटातील नगरसेवक उपस्थित होते. मात्र, भाजपच्या हाळवणकर गटातील सर्व नगरसेवक, शिवसेना तसेच शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभेकडे पाठ फिरवत अनुपस्थिती दर्शविली. उपमहापौर अनिल डाळ्या यांनीही या सभेला दांडी मारल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले. गेल्या काही दिवसांपासून २२ कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरवरून आमदार डॉ. राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर गटामध्ये मतभेद उफाळून आले होते. आजच्या सभेतील अनुपस्थितीमुळे हे मतभेद पुन्हा एकदा उघड झाल्याचे स्पष्ट दिसून आले.
विशेष म्हणजे ही सभा अवघ्या दोन मिनिटांत संपली. इचलकरंजी नगरपालिकेच्या तसेच महानगरपालिकेच्या इतिहासात इतक्या कमी वेळात विशेष सभा संपल्याची ही बहुधा पहिलीच घटना असल्याची चर्चा दिवसभर महानगरपालिका परिसरात सुरू होती. २२ कोटी रुपयांच्या कचरा उठावाच्या टेंडरला मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील स्वच्छता व्यवस्थेच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया वेगाने सुरू होणार असली, तरी या टेंडरच्या निमित्ताने भाजपमधील आवाडे-हाळवणकर गटातील राजकीय संघर्ष पुन्हा ऐरणीवर आल्याचे आजच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे.
या सभेला आवाडे गटाचे २४ नगरसेवक उपस्थित होते. दुसरीकडे, शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी या सभेकडे पाठ फिरवत सभागृहात प्रवेश न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केले. आंदोलनादरम्यान आमदार, महापौर आणि आयुक्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. "हिटलरशाही चालणार नाही", "आमदार-महापौर-आयुक्तांचा निषेध असो" तसेच "भाऊ-बहीण वाटून खाऊ" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
२२ कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरवरून गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकारण चांगलेच तापले असून, आजच्या सभेत त्याचे पडसाद उमटले. विशेष म्हणजे ही सभा अवघ्या दोन मिनिटांत संपविण्यात आल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाले. हाळवणकर गटानेही या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याने सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले.
आवाडे- हाळवणकर संघर्ष
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत इचलकरंजीचे तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या आवाडे आणि सुरेश हाळवणकर यांच्यातील राजकीय समिकरणांना नवीन वळण मिळाले होते. आता आमदार राहुल आवाडे यांनी भाजपचेच माजी आमदार हाळवणकर यांच्याविरोधात शड्डू ठोकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.