

Satara, 03 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून एकत्र लढणार आहे. त्या अनुषंगाने महायुतीमधील तीनही पक्षांच्या नेत्यांची उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पहिली बैठक साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे जिल्हा बॅंकेच्या सलग तिसऱ्या बैठकीला गोरेंची अनुपस्थिती राहिली आहे, त्यामुळे गोरे स्वतःहून बाजूला राहत आहेत की त्यांना पक्षाकडून जाणीवपूर्वक लांब ठेवले जात आहे, अशी चर्चा रंगली आहे.
सातारा जिल्हा बॅंकेच्या २१ जागांसाठी जागांसाठी २३६ अर्ज दाखल झाले आहेत. बॅंकेसाठी जिल्ह्यातील रथी-महारथी पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यातील बहुतांश मातब्बर नेते हे महायुतीसोबत आहेत, त्यामुळे जिल्हा बॅंकेवर पुन्हा कोणाची वर्णी लागणार आणि त्याअगोदर महायुतीमधून कोणा कोणाला संधी मिळणार, याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या जागांसाठी महायुतीतील प्रमुख नेत्यांची पहिली अधिकृत समन्वय बैठक शुक्रवारी रात्री उशिरा साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये झाली. या बैठकीला भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील, खासदार नितीन पाटील, प्रभाकर घार्गे, अनिल देसाई तसेच, शिवसेनेकडून प्रथमच पालकमंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हजेरी लावली. मात्र, जागावाटपाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही.
शिवसेना नेते तथा पालकमंत्री देसाई हेही आतापर्यंतच्या जिल्हा बॅंकेच्या बैठकांपासून दूर होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी प्रथमच बॅंकेच्या बैठकीला महायुतीचे नेते म्हणून हजेरी लावली आहे. बैठकीनंतर माध्यमांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी त्यांनी मकरंदआबा बोलतील असे सांगून बॅंकेबाबत राष्ट्रवादी नेत्याच्या कोर्टात चेंडू ढकलला.
देसाई यांच्याप्रमाणे भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हेही बॅंकेच्या आतापर्यंतच्या बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत. आतापर्यंत बॅंक निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या दोन बैठकांपासून गोरे दूर राहिलेले आहेत. रात्रीची तिसरी बैठक होती, त्यालाही गोरेंनी दांडी मारली आहे. गोरेंच्या अनुपस्थितीमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेदांबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे गोरे यांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये मंत्री मकरंद पाटील, उदयसिंह पाटील उंडाळकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत गुप्त बैठक झाली होती. पण गोरे यांनी महायुतीच्या आणि भाजपच्या बैठकीलाही हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत गोरेंच्या भूमिकेबाबत चर्चांना उधाण आले आहे.
सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक भाजपने स्वबळावर लढवावी, अशी जयकुमार गोरे यांची भूमिका होती. ती त्यांनी महिनाभरापूर्वीच जाहीरपणे मांडली होती. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बॅंकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवेल, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांनी बॅंकेत पक्षीय राजकारण आणू नये, त्यामुळे संस्थांचे नुकसान होते, असे सांगून अप्रत्यक्षपणे गोरेंना इशारा दिल्याचे मानले जात होते.
विशेष म्हणजे शिवेंद्रराजेंनीही स्वबळाची भाषा अद्यापर्यंत तरी केलेली नाही. तसेच, पक्षश्रेष्ठींनीही महायुती म्हणून लढण्याचा आदेश दिला आहे, त्यामुळे गोरे यांना जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या रणनीतीपासून दूर ठेवले आहे की ते स्वतःहून दूर राहत आहेत, याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.