

Solapur, 29 June : विधान परिषदेच्या निवडणुकीत छुप्या आणि उघडपणे अनेक घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तीन आमदार भाजपच्या विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या गळाला लागले होते. त्याच पद्धतीने गोरे यांनी बार्शीचे ज्येष्ठ आमदार दिलीप सोपल यांनाही फोन केल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्या दोघांमधील कटुता कमी झाल्याची चर्चा असतानाच पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने गोरे आणि सोपल यांच्या हातमिळवणीचा विधीमंडळातील फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे आमदार राजेंद्र राऊतांच्या कट्टर विरोधकाशी गोरेंनी केलेल्या हस्तांदोलनाची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
बार्शीत आमदार राजेंद्र राऊत आणि आमदार दिलीप सोपल यांच्यातील राजकीय शत्रुत्व टोकाचे आहे. राऊत हे भाजपचे विधान परिषद आमदार आहेत. विधान परिषद निवडणुकीपूर्वी झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पालकमंत्री गोरे आणि आमदार सोपल यांच्यामध्ये निधीवरून जोरदार टोलेबाजी रंगली होती.
या निवडणुकांमध्ये गोरेंचा आमदार सोपल यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला होता, त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये चांगलीच कटुता निर्माण झाली होती. पण विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने या दोन नेत्यांमधील कटुता कमी होण्यासाठी मदत झाल्याचे दिसून येते.
पालकमंत्री या नात्याने जयकुमार गोरे यांनी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनाही मदतीसाठी फोन केला होता, हे खुद्द गोरेंनी सांगितले होते. विशेष म्हणजे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नेटाने किल्ला लढवताना पालकमंत्री गोरेंवर हल्लाबोल केला होता. मात्र, त्या निवडणुकीत आमदार सोपल हे कुठेही दिसले नव्हते. त्यामुळे या दोघांमधील कटुता कमी झाल्याचे मानले जात आहे.
एकीकडे ही चर्चा सुरू असताना आमदार दिलीप सोपल आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा विधीमंडळातील एक फोटो सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. गोरे आणि सोपल हे एकमेकांच्या हातात घेऊन संवाद साधताना दिसून येत आहेत. या वेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित असल्याचे दिसते.
दोघांमधील संवादाचा तपशील समजू शकला नसला तरी राजकीय कटुता कमी झाल्याचे मानले जात आहे. आता यापुढे सोपल यांच्या सूचवलेल्या कामांनाही निधी मिळणार का, हे पाहावे लागणार आहे. पण आमदार राऊत यांच्या कट्टर विरोधकाबरोबर गोरेंनी केलेल्या हातमिळवणीची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.