
Solapur News: सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री स्विकारल्यानंतर जयकुमार गोरे यांनी विरोधकांना एकापाठोपाठ एक धक्के देण्यास सुरूवात केली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या सोलापूरमध्ये भाजपप्रवेशासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. याच त्यांच्या प्रयत्नांना मोठं यश येण्याची शक्यता असून चार माजी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र,जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या ऑपरेशन लोटस अडचणीत वादात सापडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना 440 व्होल्टचा झटका देतानाच पालकमंत्रिपद असलेल्या सोलापूरमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाचा नवा डाव टाकला आहे. मात्र,या डावानंतर सोलापूर भाजपमध्येच फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे माजी आमदार राजन पाटील,यशवंत माने,माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी नुकतीच मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्या भेटीनंतर माजी आमदार राजन पाटील यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत,तर दिलीप माने यांनी दिवाळीनंतर आपला भाजप प्रवेश होईल,हे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जाहीर केले आहे.
पण आता माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश निश्चित होताच सोलापूर भाजपमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.याचदरम्यान,सोलापूर भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पक्षप्रवेशावर सावध भूमिका मांडली आहे.त्या म्हणाल्या, भाजप कार्यालयासमोर जे नवीन प्रवेश होणारे त्याच्याविरोधात आंदोलन केलं आहे. भाजपची भूमिका स्पष्ट असून प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्यासमवेत चर्चा होऊनच हे निर्णय झाले आहेत, असंही त्यांनी म्हटलं.
तसेच या पक्षप्रवेशात शहराचा सहभाग नसतो,मोठे प्रवेश होतात, त्यावेळेस पार्टीने नक्कीच पक्षहिताचा विचार केला असेल. यातून काहीतरी बेरजेच राजकारण केलं असणार,प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी सुभाषबापू देशमुख (Subhash Deshmukh) यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला. परंतू,तरीही भाजप कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार असल्याचं तडवळकर यांनी सांगितलं.याचवेळी त्यांनी पक्षप्रवेश झाला तरी कोणावरही स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अन्याय होणार नसल्याचंही स्पष्ट केलं.
याचदरम्यान, सुभाष देशमुख यांचे कार्यकर्ते ऐकत नसल्यामुळे शहराध्यक्ष तडवळकर ह्या भडकल्या. त्यांनी आंदोलन करू नका असं कार्यकर्त्यांना बजावलं. या संदर्भात मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि सुभाष बापू यांच्याशी माझं फोनवर बोलणं झाल्याचंही त्यांनी सांगितलं.तसेच आंदोलक हे बापू समर्थक नाही तर दक्षिणमधील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या पातळीवर हा विषय नक्की सोडू,अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
तर भाजपा आमदार सुभाष देशमुख म्हणाले, भारतीय जनता पक्ष देशात, राज्यात वाढला पाहिजे,या भूमिकेचा मी आहे.पण हे सर्व करत असताना एकमेकांना विश्वासात घेणे गरजेचं असतं. जे नवीन लोकं पक्षात येणार आहे, त्यांनी किमान तीन-चार वर्षे तरी पक्षाचे काम करावे. त्यानंतर पक्षाने त्यांना भूमिका द्यावी.हे पक्षप्रवेश स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर लक्ष ठेवून प्रवेश करत असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जर भाजप जास्तीत जास्त जागा निवडून आल्या, त्यातून एक मोठा गट तयार होईल.प्रवेश करणारे जर त्यावेळेस एक झाले तर त्यावेळेस जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपचा होत असताना हा गट तो अध्यक्ष होऊन देतील का नाही अशी शंकाही आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जर उद्या काही गडबड झाली,जर जिल्हा परिषदेचे अर्धे सदस्य निघून गेले तर याचा आम्हाला धोका आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते माझ्याकडे आले होते आणि ते माझ्यासोबत भांडत होते.पण मी त्यांना पक्षनेतृत्वानं हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे त्या निर्णयाशी सहमत राहिलं पाहिजे.पण कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा, विधानसभेत आमच्याकडून काम करून घ्यायचं,आमच्या निवडणुका आल्या की,आम्हाला भागीदार करायचं,ही भावना असल्याचंही सुभाषबापूंनी बोलून दाखवलं.
मी कोणत्याही बैठकीला नाही,जेवढे माध्यमांमध्ये येते तेवढेच ऐकतो आहे.सहा माजी आमदार येत असतील तर त्यातून धोका निर्माण होऊ शकतो.सर्वांची पार्श्वभूमी काँग्रेसची असल्यामुळे हे सर्व सोपं नाही. मला तर असं वाटतं की, गुप्तचर पद्धतीने ते आत आले आहेत,गट्टाच्या गट्टा घेऊन जाण्याची भीती आहे. पक्षाने या निर्णयाचा विचार करावा असा सल्लाही सुभाष देशमुख यांनी दिला.
भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे म्हणाले,आजचे आंदोलन हे स्पॉन्सर होते,त्याचा मी जाहीर निषेध करतो. तसेच आज जी भाषणे झाली, त्याविरोधात मी पक्षाला पत्र देणार आहे की, आंदोलन करणाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी.काल काही महिला पदाधिकाऱ्यांना फोनवरून दम देऊन आंदोलनात काळी साडी घालून येण्यास सांगितले असा दावाही त्यांनी यावेळी केला.
मात्र,दिलीप माने हे सहकारातील मोठे नेते असून त्यांचा पक्षप्रवेश लवकर झाला पाहिजे.काँग्रेस मुक्त भारत ही भाजपची ही पक्षाची भूमिका आहे.त्यामुळे दिलीप माने हे सहकारातील मोठे नेते आहेत.यांना विरोध करायचा होता तर त्यांनी प्रदेश कार्यालयात जायचे होते.काल काही कार्यकर्ते माझ्याकडे आले होते त्यांनी मला स्पीकर फोनवर ऐकवले की आजचे आंदोलन कसे स्पॉन्सर होते.दिलीप माने यांची स्वतःची एक ताकद आहे.ते स्वतः एक ब्रँड आहे.पण दिलीप माने यांचा पक्षप्रवेश व्हावा,असंही काळे यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.