Satara DCC Bank : जयकुमार गोरेंच्या वाढलेल्या ताकदीला शिवेंद्रराजेंचा लगाम? साताऱ्यातील राजकीय खेळीची इनसाईड स्टोरी

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले यांच्या भूमिकेमुळे भाजपमधील अंतर्गत राजकारणाची चर्चा सुरू झाली असून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Shivendraraje Bhosale-Jaykumar Gore
Shivendraraje Bhosale-Jaykumar GoreSarkarnama
Published on: 
Updated on: 

- ऋषीकेश नळगुणे

Satara DCC Bank : सातारा जिल्ह्यातील आमदार आणि मंत्री, सोलापूरचे पालकमंत्री, तर सांगलीतील निवडणुकांची जबाबदारी या भूमिकांमुळे मंत्री जयकुमार गोरे यांचे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वजन गेल्या दोन वर्षांत चांगलेच वाढले. तिन्ही जिल्ह्यांतील भाजपच्या संघटनात्मक आणि निवडणुकीच्या राजकारणात गोरे यांचा प्रभाव दिसून येतो. अशात आता भाजपमधूनच त्यांना शह दिल्याची चर्चा आहे. गोरे यांच्या वाढत्या ताकदीला लगाम घालण्यासाठी सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्वपक्षातील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीच डाव टाकला का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून जयकुमार गोरे किंवा त्यांचे निकटवर्तीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने भाजपला बाजूला राहावे लागले. राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यानंतर भाजपने उंडाळकर हे महायुतीचे अध्यक्ष आहेत, असे म्हंटले असले तरी गोरे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील मतभेदही उघडपणे समोर आले.

सातारा, सोलापूर अन् सांगलीत गोरेंचा वाढता दबदबा

गेल्या 2 वर्षांत जयकुमार गोरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्यातील नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक, निवडणुकीनंतरची अध्यक्षपदाची निवडणूक, याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचे श्रेयही गोरे यांना दिले गेले.

सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक आणि मिरज पंचायत समितीतील सत्तांतर या राजकीय घडामोडींमध्येही गोरेंची भूमिका महत्त्वाची राहिली. त्यामुळे गोरे यांचा राजकीय प्रभाव केवळ माण-खटाव किंवा सातारा जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याच वाढत्या प्रभावामुळे साताऱ्यातील भाजपच्या अंतर्गत सत्तासमीकरणांमध्ये नवी स्पर्धा सुरू झाल्याची चर्चा आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी गोरेंची फिल्डिंग

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले यांची भूमिका महत्त्वाची होती. सातारा-जावळीतील सुमारे ४५० मतांचे एकगठ्ठा पाठबळ त्यांच्या बाजूने असल्याचे सांगितले जाते. त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यात आली.

निवडणुकीत भाजपने नऊ जागा जिंकल्यानंतर भाजपला अध्यक्षपद खुणावू लागले. पण यातील 4 संचालक गोरे गटाचे तर 5 संचालक राजे गटाचे होते. त्यानंतर जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. गोरे किंवा त्यांचे निकटवर्तीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

मात्र, अध्यक्षपदाचा निर्णय कोठे व्हावा, यावरूनच दोन्ही मंत्र्यांमधील मतभेद समोर आले. शिवेंद्रराजे भोसले यांनी अध्यक्षपदाचा निर्णय महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा करून साताऱ्यातच होईल, अशी भूमिका घेतली होती. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षपदाचा निर्णय घेतील, असे सांगत मुंबईतून नाव निश्चित व्हावे, यासाठी गोरे आग्रही होते.

Shivendraraje Bhosale-Jaykumar Gore
Satara News : शिवसेना-राष्ट्रवादीच्या जिल्हा बँकेतील खेळीचा भाजप वचपा काढणार? झेडपी, पंचायत समितीतील ‘स्वीकृत’ निवड रडारवर

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र अन् भाजपचा पत्ता कट

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी मात्र वेगळीच राजकीय समीकरणे जुळली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत भाजपला अध्यक्षपदापासून दूर ठेवले. राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची बिनविरोध निवड झाली. ही घडामोड विशेषतः अध्यक्षपदासाठी आग्रही असलेल्या गोरे यांना हा राजकीय धक्का मानली गेली. मात्र, यामागे शिवेंद्रराजे भोसले यांनी जाणीवपूर्वक शिवसेना आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर दोन्ही मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपमधील अंतर्गत संघर्षाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

'उत्तर मला नाही, शिवेंद्रराजेंना विचारा'; गोरेंचा थेट निशाणा

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर भाजपचा उमेदवार का निवडून आला नाही, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी थेट शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे बोट दाखवले. जिल्हा बँकेत भाजपचा अध्यक्ष का झाला नाही, याचे उत्तर मला नव्हे तर शिवेंद्रराजेंना विचारा, कारण त्यांच्याकडेच जबाबदारी होती, असे गोरे यांनी म्हटले. अध्यक्षपदाचा निर्णय जिल्ह्यात झाला की अन्यत्र, याचीही आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावर शिवेंद्रराजे भोसले यांनीही गोरेंना प्रत्युत्तर दिले. 'जिंकलो तर तुमच्यामुळे आणि हरलो तर आमच्यामुळे, असे कसे चालेल?' असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा वाद आता भाजपच्या दोन मंत्र्यांमधील प्रतिष्ठेचा विषय बनल्याचे दिसत आहे.

शंभुराज देसाईंचाही गोरेंना टोला

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनीही जयकुमार गोरे यांच्यावर टीका करण्याची संधी साधली. 'काही जखमा या खोलवर असतात, त्या भरण्यासाठी जालीम उपाय करावा लागतो,' असा टोला देसाई यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्हा बँकेतील अध्यक्षपदाच्या निवडीला महायुतीतील स्थानिक राजकीय संघर्षाचीही पार्श्वभूमी असल्याचे अधोरेखित झाले.

दरम्यान, अध्यक्षपदासाठी भाजपचे नाव निश्चित झाले होते, मात्र ते नाव कोणाचे होते हे 'ऑफ द रेकॉर्ड' राहू द्या, असे सांगत गोरे यांनी या प्रकरणातील उत्सुकता कायम ठेवली. 'कुठलीही निवडणूक अंतिम नसते, आगे आगे देखो होता है क्या,' असे म्हणत त्यांनी पुढील राजकीय हालचालींचे संकेतही दिले.

Shivendraraje Bhosale-Jaykumar Gore
Satara Dcc Bank Chairman : भाजप पक्षांतर्गत कुरघोड्या कोणी केल्या?; शिवेंद्रराजेंच्या कबुलीने नव्या वादाला तोंड फुटलं

गोरेंच्या वाढत्या ताकदीला शिवेंद्रराजेंचा शह?

सातारा जिल्ह्यात भाजपच्या राजकारणात शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे हे दोघेही महत्त्वाचे नेते आहेत. मात्र, गेल्या काही काळात गोरे यांचा सातारा, सोलापूर आणि सांगलीतील वाढता प्रभाव पाहता दोघांमधील राजकीय स्पर्धा अधिक ठळक होत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवेंद्रराजे यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी असताना अध्यक्षपदासाठी गोरे यांनी मुंबईतून निर्णय व्हावा, अशी भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने भाजपच्या अध्यक्षपदाच्या प्रयत्नांना धक्का बसला. त्यामुळे गोरे यांचे जिल्ह्यातील राजकीय वजन आणखी वाढू नये, यासाठीच शिवेंद्रराजेंनी वेगळी राजकीय भूमिका घेतली का, असा सवाल उपस्थित होत आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून सुरू झालेली ही शाब्दिक चकमक एवढ्यावरच थांबणार की आगामी निवडणुकांमध्येही त्याचे पडसाद उमटणार, याकडे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.