

Satara, 04 June : विधान परिषदेच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठ्या घडामोडी घडत असून बहुतांश ठिकाणी विरोधातील महाविकास आघाडीचे उमेदवार माघार घेताना दिसत आहेत. त्यामुळे महायुतीने अनेक ठिकाणी बिनविरोध बाजी मारण्याच्या तयारीत आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या सांगली सातारा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी माघार घेतली आहे. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी यासाठी यशस्वी शिष्टाई केली आहे. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अपक्ष उमेदवार तथा जयंत पाटील यांचे निकटवर्तीय बाळासाहेब पाटील यांचाही अर्ज मागे घेतला आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली होती. त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यासह विधीमंडळात उमटले होते. त्याचा बदला शिवसेना आणि राष्ट्रवादी घेणार की काय, अशी चर्चा रंगली होती.
त्या दृष्टीने शिवसेनेचे सांगलीचे नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच संचालक तानाजी पाटील यांनी सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. तगडा उमेदवार शिवसेनेने मैदानात उतरवल्याने जोरदार फाईट होण्याची चर्चा रंगली होती. मात्र, राज्यभरातील गणित पाहता कालपासून सर्व सूत्रे फिरली आणि महायुतीची बिनविरोधच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर तानाजी पाटील यांनी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. पाटील यांनी अपक्ष अर्ज ठेवला तर राज्यातील जागांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी अर्ज मागे घ्यावा, अशी सूचना शिवसेना नेत्यांनी तानाजी पाटील यांना दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तानाजी पाटील यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच महायुतीचा धर्म सर्वांनी पाळणं गरजेचे आहे, असे विधान शंभूराज देसाई यांनी केले आहे. सांगलीत देसाई आणि तानाजी पाटील यांच्यात पुन्हा बैठक झाली आहे. देसाई यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर पाटील यांनी माघारीची घोषणा केली आहे.
जयंतरावांचे निकटवर्तीय बाळासाहेब पाटलांचीही माघार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अपक्ष उमेदवार तथा जयंत पाटील यांचे निकटवर्तीय बाळासाहेब पाटील यांचाही अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे सांगली सातारामध्ये आता भाजपचे धैर्यशील कदम यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभय जगताप यांच्यात दुरंगी लढणार होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.