
Satara News : राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने आले असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेत सहभागी आहे. भाजप महायुतीत सर्वात मोठा पक्ष असल्याने सर्वाधिक मंत्री त्यांचे आहेत. तर आता महत्वाच्या जिल्ह्यांध्ये भाजपने आपले पालकमंत्री नियुक्त केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर जाण्याआधी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची यादी जाहीर केली होती. पण त्यानंतर नाशिक आणि रायगडमध्ये मोठी नाराजी उघड झाली. कोल्हापूरमध्ये देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली खदखद बोलून दाखवताना, आपण जनतेच्या मनातले पालकमंत्री असल्याचे म्हटले होते. पण आता साताऱ्यात देखील कार्यकर्त्यांची नाराजी समोर येत असून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यायला हवं, अशी मागणी केली जात आहे. मंत्रीमंडळाच्या शपथविधी आधी अशाच पद्धतीने एका पोलिस कर्माचाऱ्याने शिवेंद्रसिंहराजेंच्या मंत्रिपदासाठी आंदोलन केले होते. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिकेने दंड थोपाटले आहेत.
कधीकाळी काँग्रेसच्या झेंड्या खाली साताऱ्यात राजकारण करणारे शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपवाशी झाले. याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील होते. तर भाजपच्या तिकीटावर दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. ही त्यांची पाचवी टर्म आहे. तर त्यांचे वडील अभयसिंहराजे भोसले हे देखील काँग्रेसच्या सरकारमध्ये सहकारमंत्री होते.
दुसऱ्यांदा आमदार झालेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देवेंद्र फडणवीस यांनी थेट मंत्री बनवले. त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी दिली. पण पालकमंत्रीपदावर नियुक्ती केलेली नाही. यावरून आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राज्यात दोन नंबरचे मताधिक्य मिळाले आहे. तर ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्यांचा पालकमंत्री असा नियम महायुतीत आहे. मात्र या नियमाला साताऱ्यात हरताळ फासल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त केली जात आहे.
इतर जिल्ह्यात ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाच्या मंत्र्याकडे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. मात्र नाशिक आणि रायगडमध्ये मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या पक्षांच्या मंत्र्यांना पालकमंत्री बनवले. त्यामुळेच तेथे आता वाद आणि नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. साताऱ्यातही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना डावलून शंभूराज देसाई पालकमंत्री यांना पालकमंत्री केल्याने नाराजी समोर येत आहे.
याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत घेत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी, शिवेंद्रसिंहराजे हे सर्वसमावेश नेतृत्व आहेत. मुख्यमंत्र्यानी गादीचा मान राखून सध्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती द्यावी, अशी मागनी केली आहे.
सरकारला इशारा देताना, भाजपने 26 जानेवारीला ध्वजवंदनाचा मान पालकमंत्री म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच द्यावा, अशी विनंती केली आहे. जर ही विनंती मान्य न केल्यास उपोषण करण्याचा इशाराही कांचन साळुंखे यांनी दिला आहे. त्यांनी रायगड व नाशिक जिल्ह्यात नाराजीनाट्यानंतर पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्याचे सांगितले. तेथे दबाव वाढल्यानेच हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, साताऱ्यात जनसामान्यांच्या मनात मुळातच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव असतानाही दुसऱ्याचे नाव जाहीर कसे जाहीर झाले असाही सवाल आता उपस्थित केला जातोयय
नाशिक, रायगड आणि कोल्हापूर पाठोपाठ आता साताऱ्यातही नाराजीचा सूर उमटल असून पालकमंत्री म्हणून अनेकांनी काम पाहिले मात्र अशाप्रकारे दबावाचे राजकारण झाले नसल्याचाही दावा साताऱ्यात केला जातोय. तर सध्याचा निर्णय बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही कांचन साळुंखे यांनी सांगितले आहे. दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विचार न केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमचा मार्ग आम्हाला निवडावा लागेल असेही सूचक वक्तव्यही करण्यात येत आहे.
सातारकरांच्या मनात शिवेंद्रसिंहराजे भोसले असून तेच पालकमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा होती. पण वरिष्ठांनी साताऱ्यावर अन्याय केला. पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाईंची नियुक्त करण्यात आली. पण त्यांच्या नियुक्तीने जिल्ह्यात कुठेही उत्साह दिसून आलेला नाही. यावरूनच साताऱ्याची जनता नाराज असल्याचे दिसून येते. ही नाराजी दूर करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच जिल्ह्याचे पालकमंत्री करावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान शिवेंद्रसिंहराजे-उदयनराजेंना कॅबिनेट मंत्री करा अशी मागणी करण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या जीवाशी खेळ केला होता. राज्यातील महायुतीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे शपथविधी 5 डिसेंबरला होणार होता. त्याआधी सदाशिव ढाकणे या पोलीस कर्मचाऱ्याने राजूर-टेंभुर्णी महामार्गावरील मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते. जे चांगलेच चर्चेत आले होते. त्याने राज्याच्या मंत्रिमंडळात शिवेंद्रसिंहराजे आणि केंद्राच्या मंत्रिमंडळात उदयनराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्री करा, अशी मागणी केली होती. याबाबतचे आश्वासन पुढील दोन तासात अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, अन्यथा खाली उतरणार नाही, आंदोलन सुरूच राहील असे म्हटले होते. यामुळे पोलिसांची भंबेरी उडाली होती. शेवटी यात उदयनराजे भोसले यांना हस्तक्षेप करावा लागला होता. त्यांनी या पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवर संपर्क करत मोबाइल टॉवरवरून खाली येण्याची विनंती केली आहे. याच्या दुसऱ्याच दिवशी राज्यमंत्रीमंडळाच्या शपथविधीत शिवेंद्रसिंहराजे यांनी कॅबिनेट म्हणून शपथ घेतली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.