

कात्रज पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला ‘अजितदादा पवार’ हे नाव देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
अजित पवार यांच्या अकस्मात निधनामुळे संपूर्ण सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
कात्रज दूध संघासाठी आणि पुणे जिल्ह्यातील सहकार चळवळीकरिता ही मोठी आणि न भरून निघणारी हानी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर आज सहावा दिवस होत असून राज्य अद्यापही शोक सागरात बुडाला आहे. दरम्यान शनिवारी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीचे सुत्रे आपल्या हाती घेत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच पहिलाच दौरा साताऱ्याला करत अजितदादांचे अंगरक्षक यांच्या घरी जावून सांत्वन केलं. तसेच कराड इथल्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळ असलेल्या प्रितीसंगमावर जावून अभिवादन केले. यामुळे अजितदादांच्या पावलांवर पावले त्या टाकत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता अजितदादांच्या स्मृती जपणारा पहिला निर्णय त्यांच्या पुण्यात घेण्यात आला असून नामवंत दूध संघाला अजितदादांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करत सहकार क्षेत्रात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर जेष्ठ नेते शरद पवार दादांच्या आठवणींनी भावूक झाल्याचे समोर आले होते. तसेच ते मुंबईला निघण्याआधी बारामती येथील ज्या विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात अजितदादांचे अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामांमध्ये अंत्यसंस्कार झाले, तेथे गेले.
यावेळी अंत्यस्थळाकडे बघताच शरद पवार भावूक झाले होते. दशक्रिया याबाबत बोलताना दादांचे स्मारक उभ कारावं लागतयं हेच दु:खदायक असल्याचेही ते म्हणाले होते. याच मैदानावर अजितदादांच्या आठवणी जपण्यासाठी यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावं अशा सूचना त्यांनी, विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी संवाद साधना दिल्या होत्या. यामुळे बारामतीतच अजितदादांचे भव्य स्मारक होणार हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान सहकार क्षेत्रात अजितदादांच्या निधनानंतर मोठा निर्णय घेण्यात आला असून पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) संघाने आपल्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संघाला ‘अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत संघाच्या संचालक मंडळाने शनिवारी (ता. ३१) सर्वानुमते बैठकीत ठराव मंजूर केला आहे.
यावेळी, अजित पवार यांचे अकस्मात निधन झाल्याने संपूर्ण सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ही हानी पुणे जिल्ह्यातील सहकार चळवळीकरिता आणि विशेषतः कात्रज दूध संघासाठी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना संघाने व्यक्त केली आहे. तर संघ प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. संघाच्या वार्षिक सभेला त्यांनी उपस्थित राहून संस्थेच्या कार्यपद्धती, विस्तार योजना तसेच प्रशासनिक समन्वयासाठी महत्त्वपूर्ण पाठबळ दिले होते. पवार कुटुंबाचे सहकार चळवळीला आणि संघाच्या विविध उपक्रमांना सातत्याने सहकार्य लाभत आले आहे.
संघाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या टप्प्यांवर, विशेषतः पायाभूत सुविधा उभारणी आणि दीर्घकालीन नियोजनासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत अजितदादा पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी संस्थात्मक बळकटीकरण, सहकारी संस्थांचे सक्षमीकरण आणि दीर्घकालीन विकासाचा व्यापक दृष्टिकोन हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य असल्याची भावना संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.
हा निर्णय केवळ नाव बदलण्यापुरता मर्यादित नसून सहकार क्षेत्रासाठी केलेल्या अजितदादा पवार यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या नेतृत्वाची स्मृती कायम जपण्याचा प्रयत्न आहे. नामकरणासंदर्भातील पुढील प्रशासकीय प्रक्रिया व आवश्यक परवानग्या पूर्ण करण्याची कार्यवाही संबंधित स्तरावर लवकरच करण्यात येणार असल्याचेही संघाकडून सांगण्यात आले आहे.
1. कात्रज दूध संघाचे नवीन नाव काय आहे?
‘अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज’ असे नवीन नाव ठेवण्यात आले आहे.
2. हा निर्णय कधी घेण्यात आला?
शनिवारी ३१ तारखेला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजूर झाला.
3. संघाचे नाव का बदलण्यात आले?
सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक अजित पवार यांच्या स्मरणार्थ हा निर्णय घेण्यात आला.
4. अजित पवार यांचे सहकार क्षेत्रातील योगदान काय होते?
पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळ मजबूत करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.
5. या निर्णयाला संचालक मंडळाची मान्यता होती का?
होय, हा ठराव संचालक मंडळाने सर्वानुमते मंजूर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.