Hatkanangle (Kolhapur) : गेल्या दोन दिवसांत घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर आज झालेल्या हातकणंगले नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष निवडीत कविता राहुल हातकणंगलेकर यांची बिनविरोध निवड झाली. (Kavita Hatkananglekar was elected unopposed as Deputy President of Hatkanangle)
निकराचे प्रयत्न करूनही कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादीसह (ncp) शिंदे गटाला (Shivsena) पदापासून दूर राहावे लागले. शिंदे गटातील तीन सदस्यांनी पक्षाशी काडीमोड घेत विरोधी भाजपशी (BJP) हातमिळवणी केल्याने भाजप, अपक्ष आणि शिंदे गटातील तीन फुटीर सदस्यांची सरशी झाली, शिंदे गटात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले असून शिंदे गटाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी उपसभापती दीपक वाडकर आणि भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले या विजयाचे शिल्पकार ठरले.
निवडीसाठी बोलवलेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर होते. निवडीनंतर त्यांनी व मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी सौ. हातकणंगलेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यकर्त्यानी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
हातकणंगले नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी आज ३० जून दुपारी विशेष सभा बोलावण्यात आली होती. कविता हातकणंगलेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सभाध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांनी जाहिर केले. निवडीनंतर नगरसेवक रमजान मुजावर, अभिजित लुगडे, राजू इंगवले व दिपक वाडकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
निवडीपूर्वी शिंदे गटातील गटनेत्यांनी एकाच वेळी शिंदे गटातील कविता हातकणंगलेकर व अपक्ष छाया पाटील या दोघा झ्छुकांना शब्द दिल्याने पेच निर्माण झाल्याने नेतेमंडळीची डोकेदुखी वाढली होती. त्या परिस्थितीत शिंदे गटाकडून कविता हातकणंगलेकर यांचे नाव निश्चित केले गेले, तर कॉंग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले. आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी लक्ष घालून सत्ता स्थापनेदरम्यानच्या लेखी करारानुसार कॉंग्रेसला संधी मिळण्यासाठी आग्रह धरला. त्यादृष्टीने शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्याशी चर्चाही केली. नेमका याच दुहीचा फायदा घेत भाजपने तीन अपक्षांना सोबत घेत मोट बांधली.
खडबडून जागे झालेल्या शिंदे गटाने काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेत बाजूला जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या राष्ट्रवादीच्या विजय खोत यांनाच उपनगराध्यक्षपदाची ऑफर देत मोठा राजकिय डाव टाकला. त्यामुळे भाजप व सहकाऱ्यांनी थेट शिंदे गटच फोडला. शिदे गटातील रणजित धनगर, कविता हातकणंगलेकर व शुभदा स्वामी हे तिघे शिदे गट सोडून भाजपाला मिळाले. त्यामुळे त्यांच्याकडे भाजपचे पाच, अपक्ष तीन, शिंदे गटातून मिळालेले तीन अशी अकराची बेरीज झाली. तर विरोधकांकडे केवळ सातच जण शिल्लक राहिले.
पराभव समोर दिसत असल्याने त्यांनी आज अर्जही दाखल केला नाही. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडीचे राजकारण केले गेले. अनेक मंत्री, खासदार, आमदारांमार्फत दबावतंत्राचाही वापर करण्यात आला. मात्र अखेरीस हातकणंगलेकर यांनी उपनगराध्यक्षपद पटकावत शिंदे गटाला चेकमेट केले. निवडी दरम्यान ताराराणी पक्षाचे आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपशी हातमिळवणी करत त्यांच्या गटाच्या एकमेव सदस्याला भाजपच्या स्वाधीन करत आपली भाजपसोबतची सोयरीक अधिक घट्ट केली.
ठळक घडामोडी
नगरपंचायत स्थापनेपासून शिंदे गटाने सत्तेसाठी सोयीची भूमिका घेत काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करत सोयीस्कर सोयरिक जुळवली होती. याच वेळी त्यांनी राज्यातील राजकिय समीकरणांना मूठमाती दिली होती. या निवडीत भाजपने त्यांच्यावर पलटवार करत बाजी मारली.भाजपासोबत आलेल्या तीन अपक्ष व शिंदे गटातील तीन अशा सहाजणांचे गटनेतेपद ताराराणी पक्षाचे नगरसेवक आभिजित लुगडे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.