Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांचा गट महायुतीसोबत गेल्याने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत पोकळी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड हा महाविकास आघाडीसाठी गुंतागुंतीचा विषय होत आहे. चांगला, सुसंस्कृत चेहरा म्हणून गोकुळचे संचालक चेतन नरके यांच्याकडे पाहिले जाते. कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी नरके यांनी ठेवली आहे. त्यासाठी त्यांनी कोल्हापूरपासून ते मुंबईपर्यंत महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांची भेट घेतली आहे. मतदारसंघात पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांचे पुरेसे बळ नसले तरी राजकीय संबंधांच्या आधारावरच नरके यांची तयारी सुरू आहे.
माजी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील यांच्या खांद्यावरच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची धुरा असणार आहे, तर दुसरीकडे भाजपने केलेली विस्तारवाढ आणि पक्षप्रवेश हे महाविकास आघाडीला आव्हान असणार आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून चेतन नरके यांना उमेदवारी मिळाल्यास लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल. महाविकास आघाडीने नरके यांचा लोकसभा निवडणुकीसाठी विचार केला, तर कोल्हापूर मतदारसंघाला आर्थिक क्षेत्राचे भरीव ज्ञान असलेला एक उमेदवार मिळू शकतो. (Latest Marathi News)
डॉ. चेतन अरुण नरके
11 सप्टेंबर 1978
एम. बी. ए. फायनान्स (यूएसए)
सहकार, शिक्षण, क्रीडा, बँकिंग, शेती, युवा, राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रावर डॉ. चेतन नरके यांचे वडील अरुण नरके यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यकुशलतेचा ठसा उमटवला आहे. अरुण नरके या नावाला सहकार क्षेत्रात एक वलय आहे आणि हे वलय दुग्ध व्यवसायातल्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरीने अधिकच विस्तारले आहे. महाराष्ट्रात या नावाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. इंडियन डेअरीसारख्या बलाढ्य संस्थेत त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. शिक्षणमहर्षी डी. सी. नरके त्यांचे पुत्र म्हणूनही ओळख आहे. वडिलांचा वारसा घेत चेतन नरके यांनीदेखील सहकार क्षेत्रात ठसा उमटावयला सुरुवात केली आहे. चेतन नरके यांना संदीप नरके हे भाऊ, लीना नरके या भगिनी आहेत. संदीप नरके सध्या शेती पाहतात. चेतन नरके यांचा विवाह पुण्यातील स्निग्धा यांच्याशी झाला आहे. त्या सिंगापूर गव्हर्न्मेंट सरकारच्या सिव्हिल केसेसवर काम पाहतात.
चेतन नरके हे थायलंड सरकारचे आर्थिक सल्लागार आहेत. गोकुळ दूध संघाचेही ते संचालक आहेत. शिक्षण संस्था, इंडियन डेअरीचे संचालक, यूथ बँकेचे चेअरमन, अरुण नरके फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. त्यांना २० वर्षांचा आंतरराष्ट्रीय कंपन्यांत काम करण्याचा अनुभव आहे. प्रागतिक मान्यताप्राप्त ब्रँड्सचे त्यांनी नेतृत्व केले आहे. युरोप आणि आशियाई देशांतील अर्थव्यवस्थापक आणि मार्केटिंग व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. देश आणि विदेशातील उद्योग, अर्थ, कृषी, काॅर्पोरेट, समाजकारण आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसोबत त्यांनी काम केले आहे.
कोल्हापूर
ते सध्या कोणत्याही राजकीय पक्षात नाहीत. महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता
डॉ. चेतन नरके यांनी पहिल्यांदाच कोल्हापूर दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवत असताना तत्कालीन सत्ताधारी महाडिक गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. केवळ तीन संचालक विजयी झाले. त्यामध्ये नरके यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत चेतन नरके विजयी झाले. विजयानंतर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या सोबत मिळून मिसळून काम करत असल्याचे चित्र आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गोकुळ मध्ये ही सावध पावले उचलले आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या पाठिंब्यावरच त्यांना लोकसभेला सामोरे जायचे आहे. त्यामुळे पहिल्याच राजकीय प्रवासात कुणालाही न दुखवता त्यांचं राजकारण सुरू आहे.
गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून नरके कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केलेली आहे. ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवतात. चेतन नरके यांनी विविध महाविद्यालये आणि खासगी क्षेत्रात आर्थिक धोरणविषयक व्याख्याने दिली आहेत.
निवडणूक लढवली नव्हती
निवडणूक लढवली नव्हती.
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून डॉ. चेतन नरके यांनी गेल्या वर्षभरापासून मतदारसंघातील गावे पिंजून काढली आहेत. मतदारसंघातील सर्व 1255 गावांत आतापर्यंत त्यांनी दौरे केले असून तळागाळातील लोकांची भेट घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या वर्षभरापासून प्रत्येक सणाला त्यांची जाहिरातबाजी मतदारसंघात पाहायला मिळाली. महाविकासकडून उमेदवारीसाठी त्यांनी आतापर्यंत चार वेळा मातोश्रीकडे धाव घेतली आहे. व्यक्तिगत प्रचारही सुरू ठेवला आहे.
मतदारसंघातील तळागाळातील लोकांपर्यंत सध्या चेतन नरके यांचे नाव चर्चेत नसले तरी त्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी ते सोशल मीडियात देखील ॲक्टिव्ह आहेत. रोज दिलेल्या गाठीभेटी, आपले व्हिजन सांगण्यात चेतन नरके सध्या तरी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत.
आतापर्यंत डॉ. चेतन नरके यांनी कोणतेही राजकीय वक्तव्य केले नाही. आपल्या वक्तव्याने कोणीही दुखावणार नाही किंवा राजकीय शत्रू निर्माण होणार नाहीत, याची काळजी ते घेत असतात.
वडील अरुण नरके
चेतन नरके हे उच्चशिक्षित आहेत. आर्थिक क्षेत्रातील कामाचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांना आर्थिक क्षेत्राचे भरीव ज्ञान आहे. ते सध्या थायलंड सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहतात. त्यांच्या या ज्ञानाचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आर्थिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीही वापर होऊ शकतो. उमेदवारी मिळाली तर मतदारसंघातील आर्थिक प्रश्नांवरून ते सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारीची दमछाक करू शकतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेतन नरके हे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.
चेतन नरके यांना आर्थिक क्षेत्राचे मोठे ज्ञान आहे. मात्र समाजाला त्याबाबत अद्याप फार माहिती नाही. ते कोणत्याही राजकीय पक्षात नाहीत.
सध्याच्या घडीला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडे महायुतीला आव्हान देण्यासाठी सक्षम असा उमेदवार दिसत नाही. चेतन नरके यांचे आर्थिक क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय, चमकदार आहे. त्यांची राजकीय पार्श्वभूमी संयमी आहे. आजपर्यंतच्या इतिहासात काँग्रेस किंवा महायुतीच्या उमेदवाराने तळागाळापर्यंत प्रचार केलेला दिसत नाही. मात्र, चेतन नरके हे कोल्हापूर जिल्ह्यातील 1255 गावांत पोहोचले आहेत. प्रत्येक गावात जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे, ते करत असलेल्या कामाची माहिती दिली आहे. त्यांना उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडीलाच सध्याच्या घडीला धक्का बसू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.