

कोल्हापूर : नातेवाईकांच्या नावावर बाजार समितीची ३६०० चौरस फूट इतकी मालमत्ता भाडेतत्वावर घेतल्याचे प्रकरण कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील तीन संचालकांना भोवणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी संबंधित तीन संचालकांना अपात्र ते संदर्भाततील नोटीस धाडली आहे.
नोटीस पाठविण्यात आलेल्या 'त्या' तीन संचालकांना १९ मेपर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. नोटिस काढलेल्या या तीन संचालकांपैकी प्रा. शेखर देसाई व भारत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) गटाचे संचालक आहेत. तर वाडकर हे काँग्रेसचे संचालक आहेत. बाजार समितीच्या तीन संचालकांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे.
बाजार समितीचे संचालक प्रा. शेखर शंकरराव देसाई, सुयोग सुभाष वाडकर आणि भारत बाबासाहेब पाटील भुयेकर यांना नोटीस देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम २०१७ चे नियम क्रमांक दहा (१) नुसार संचालक म्हणून कार्यरत असताना नातेवाईकांच्या नावावर भाडेतत्वावर जागा घेता येत नाही. पण या नियमाचे उल्लंघन करून या तीन संचालकांनी बाजार समितीमध्ये नातेवाईकांच्या नावावर ३६०० चौरस फूट मालमत्ता भाडेतत्वावर घेतली आहे. यामुळे अपात्र करावे, अशी तक्रार करण्यात आली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक करे यांनी बाजार समिती सचिवांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर कराव्यात अशा सूचना केल्या होत्या. बाजार समितीकडून जिल्हा उपनिबंधकांना अहवाल सादर झाला आहे. त्या चौकशी अहवालाच्या आधारे जिल्हा उपनिबंधकांनी, त्या तीन संचालकांना अपात्र का करू नये ? अशी नोटिस बजावली आहे. यासंदर्भात संबंधित संचालकांनी १९ मे २०२६ रोजी दुपारी तीन वाजता प्रत्यक्षा अथवा त्यांच्या प्रतिनिधीमार्फत खुलासा सादर करावा असे म्हटले आहे.