Kolhapur News, 06 August : राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यासाठी इच्छुकांसह राजकीय पक्षांनीही दंड थोपटले आहेत. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक विविध मुद्द्यांवर आक्रमक झाले आहेत.
विविध प्रश्नांवरील आंदोलने, वरिष्ठ नेत्यांचे दौरे, पूरस्थितीवरून हल्लाबोल करून नेस्तनाबुत करण्याचा डाव आखाला जात आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून विविध योजना, अर्थसंकल्पातून सामान्यांना काय मिळाले, हे जनतेपर्यंत पोहचवून पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठीची तयारी सुरु केली आहे.
जनतेच्या प्रश्नावर आणि भावनेला हाथ घालून सत्ताधारी आणि विरोधक विधानसभेसाठी स्वार झाले असून 'होय आम्हीच केले', असे छाती ठोकपणे सांगत वातावरण निर्मिती सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) अपेक्षेपेक्षा जास्त जागा कमावून आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या 30 दिवसात कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासाठी गडबड सुरू आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या दिल्लीच्या हायकमांड बरोबर बैठकीचे सत्र सुरू आहेत. मिळणारा कालावधी कमी असल्याने आतापासूनच कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाने दंड थोपटले आहेत. होय आम्हीच केलं आणि आम्हीच करणार म्हणत आंदोलनाचा प्रत्येक मुद्दा हाताशी धरून रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या विशाळगड मुद्द्यावरूनही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी आक्रमक होत महायुती सरकारवर टीकास्र सोडलं आहे. भावनिक मुद्द्यांचा आधार घेत सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या विचारांना तिलांजली देत सोयीस्कर भूमिका घेतली आहे.
चार दिवसांपूर्वी काँग्रेसने कोल्हापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दुरास्थेवरून टोल नाक्यावर आंदोलन करत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यातून टोल दरात 25 टक्के सवलत मिळाली. त्याचा आदेश जुना असला तरी या आंदोलनाच्या निमित्ताने त्याची अंमलबजावणी करण्यात काँग्रेसला यश आले.
तर कोल्हापुरात आलेल्या महापुराचा पहिल्या दिवसापासून काँग्रेसने आढावा घेत सत्ताधारी महायुतीवर आसूड ओढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गाठीभेटी आणि बैठकांचा जोर वाढला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कामांचा शुभारंभ करत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्राकडून महाराष्ट्राला निधी मिळाला नसल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र हा आरोप खोटा ठरवण्यासाठी महायुतीच्या आमदार-खासदारांनी शड्डू ठोकला आहे. महायुतीतील भाजपकडून राज्याच्या व केंद्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय मिळाले, याची माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगितली जात आहे.
11 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर जिल्ह्यातील वातावरण निर्मितीसाठी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तालुका स्तरावर विविध महिला मेळावे घेतले जाणार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून यूथ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी युवा वर्गाला हाताशी धरून मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याशिवाय लाडकी बहीण योजनेचे मार्केटिंग व विविध कार्यक्रमाचे पुढील दोन आठवड्यांत नियोजन आहे. त्यामुळे आता सगळेच पक्ष आणि विधानसभेसाठी अॅक्टीव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.