

Kolhapur Sangli ZP News : कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषदेचा निकाल लागून पंधरा दिवस उलटले तरी अजून सत्ता स्थापनेबाबत महायुतीतील घटक पक्षात कोणतीच चर्चा होताना दिसत नाही. त्यातच ग्रामविकास विभागाने 20 मार्चपूर्वी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतीची निवड करावी अशा स्पष्ट सूचना दिल्यानंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर वन असला तरीही भाजपकडून पहिला अध्यक्ष करण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत. तर सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपचाच अध्यक्ष करण्यासाठी नेत्यांची मोठी लॉबी मुंबईत कार्यरत आहे. गुरूवारी (ता. 26) त्या संदर्भात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.
कोल्हापुर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने 20, भाजप 12, काँग्रेस 14, शिवसेना 9, जनसुराज्य 5, शाहू आघाडी 4, ठाकरे सेना 1, स्वाभिमानी 1 आणि शिवशाहू आघाडी 1 आणि अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्या असल्या तरी भाजपने देखील जनसुराज्य शक्तीच्या मदतीने भाजपचा अध्यक्ष करण्याचा दावा केला आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुरगुडच्या भाषणातून राष्ट्रवादीचाच अध्यक्ष करणार असल्याची घोषणा केली असली, तरी गुरूवारी (ता. 26) दिवसभरात मुंबईमध्ये भाजपच्या गोटात कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपचाच अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या संदर्भात मोठे लॉबिंग नेत्यांकडून सुरू असून राष्ट्रवादीवर दबाव वाढवला जात आहे. त्यामुळे नेत्यांकडून कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपचाच पहिला अध्यक्ष होईल असा ठामपणे दावा केला जात आहे.
तसेच सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा नंबर वन ठरला असून त्यापाठोपाठ भाजप आहे. मात्र भाजपकडून जागा वाटपात मिळालेली वागणूक आणि दादागिरी यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्यात गुप्त बैठका घेण्याचे सत्र सुरु होते. भाजपला बाजूला ठेवून शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू होत्या.
मात्र महायुती म्हणून सर्वच घटक पक्ष एकत्र येण्याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील पर्याय नाही. महायुतीकडे काठावरचे बहुमत सांगली जिल्हा परिषदेमध्ये असले तरी शरद पवार गटातील सदस्य फोडण्यासाठी भाजपची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील आमदार गेल्या आठवडाभरापासून मुंबईत असल्यामुळे जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष करण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत.
नगरपालिका, नगरपंचायतबरोबर महानगरपालिका निवडणुकीत देखील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये भाजप नंबर वन बनला आहे. तर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर वन बनला असला तरी सध्या राज्य पातळीवर भाजपचाच अध्यक्ष जिल्हा परिषदेवर केला असा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. तर सांगलीत देखील हीच परिस्थिती असून दोन्ही जिल्हा परिषदेवर पहिला भाजपचा अध्यक्ष करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून मुंबई स्तरावर सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.