

Kolhapur News: विधानसभा निवडणुकीतील कट्टर विरोधक आणि गोकुळच्या निवडणुकीत मांडीला मांडी लावून प्रचारात अग्रेसर राहणारे माजी आमदार के. पी. पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे. माजी आमदार पाटील यांनी पुन्हा एकदा आबिटकर यांना डिवचून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी गाऱ्हाणे घातले आहे.
राधानगरी-भुदरगडसारख्या बागायती क्षेत्रातून शक्तिपीठ रस्त्याची गरजच नाही, असे आमचे ठाम मत आहे. विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती.
त्याच शिंदे यांच्याकडे ‘एमएसआरडीसी’चा पूर्ण कार्यभार आहे. आता जनतेचा आक्रोश पाहून त्यांच्याच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शक्तिपीठ रद्द करण्याचा आदेश आणावा व शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू नये, अशी भूमिका माजी आमदार के. पी. पाटील यांनी बिद्री येथे पत्रकार परिषदेत मांडली.
पाटील म्हणाले, मी नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही वेळोवेळी संघर्षाची भूमिका घेतली आहे. शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही.
शक्तिपीठ महामार्ग या परिसरातून जाऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. शेतकऱ्यांच्या जमिनी, त्यांचे अस्तित्व आणि त्यांच्या पुढील पिढ्यांचे भविष्य धोक्यात घालणारा कोणताही निर्णय आम्हाला मान्य नाही.
ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितापेक्षा कोणताही विकास महत्त्वाचा नाही. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना देशोधडीला लावणे योग्य नाही. विशेषतः अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात गेल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होणार आहे.
अनेक कुटुंबांचे संपूर्ण अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. पिढ्यान्पिढ्या जपलेल्या जमिनी महामार्गात गेल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असताना त्यांच्या इच्छेविरुद्ध प्रकल्प पुढे रेटणे योग्य नाही. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होणे आवश्यक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.