Maharashtra Political News : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील ( Vishal Patil ) यांनी सोमवारी अपक्ष अर्ज दाखल केला आहे, तर आज मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत ( 16 एप्रिल ) अतिरिक्त अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात विशाल पाटलांनी बंडखोरी केली आहे. या बंडामुळे शिवसेनेची ( ठाकरे गट ) डोकेदुखी वाढली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे गट ) आमने-सामने आले आहेत. सांगली मतदारसंघ जागावाटपात मिळावा म्हणून काँग्रेस नेत्यांनी अतोनात प्रयत्न केले.
सांगली जिल्ह्यातील नेते, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, विशाल पाटील ( Vishal Patil ) यांनी दिल्लीलाही फेऱ्या मारल्या होत्या. पण, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) सांगलीच्या जागेवर ठाम राहिल्यानं काँग्रेसला सांगलीच्या जागा सोडावी लागली.
सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ. पण, सांगलीची जागा शिवसेनेला गेल्यानं विशाल पाटील यांनी अखेर बंडखोरी केली. सोमवारी एकीकडे महाविकास आघाडीचा मेळावा सुरू असतानाच विशाल पाटील यांनी गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आज ते अतिरिक्त अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सांगलीत तिरंगी लढत?
महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. शिवसेनेनं येथून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, भाजपकडून संजयकाका पाटील यांना सलग तिसऱ्यांदा तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले, तर सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
2019 मध्ये मिळालेली मते
2019 च्या सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळाली होती. त्यामुळे विशाल पाटील स्वाभिमानीच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात कडवी झुंज झाली होती. संजयकाका पाटील यांना 5 लाख 8 हजार 995 मते मिळाली होती, तर विशाल पाटील यांना 3 लाख 44 हजार 643 मते मिळालेली. वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 3 लाख 234 मतं मिळाली होती.
काँग्रेस पाटलांचे बंड थोपवणार?
काँग्रेसची मते विशाल पाटलांना मिळाली, तर याचा फटका चंद्रहार पाटील ( Chandrahar Patil ) यांना बसण्याची शक्यता आहे. विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशाल पाटलांचे बंड थोपवण्यास काँग्रेस यशस्वी होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
"सांगलीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला"
विशाल पाटलांच्या बंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आघाडीत सर्वांचं समाधान होत नाही. सांगलीच्या जागेसाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केला. पण, शेवटी मैत्रीत किती ताणायचं हा प्रश्न निर्माण होतो. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीत जास्त भांडणं चालू आहेत. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्यात येईल, असं वातावरण आम्ही निर्माण करू," असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.