Lok Sabha Election 2024 : कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. शिवसेना ठाकरे गटानेही या मतदारसंघावर दावा केला असला तरी शाहू महाराज यांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाने एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
शाहू महाराज छत्रपती हे राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचे पाइक आहेत. दुसरीकडे, पुरोगामी अशी कोल्हापूरची प्रतिमा पुसून टाकण्याचा डाव काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी सुरू केला आहे, हे गेल्या तीन-चार वर्षांतील विविध घटनांवरून दिसू येते. त्याला छेद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित केल्याचे सांगितले जाते.
कोल्हापूरची लढत ही व्यक्तिगत नसून ती वैचारिक आहे. हिंदुत्ववादी विरुद्ध पुरोगामी अशी ही लढत होणार असून, त्याचा संदेश राज्यभर जाणार आहे. म्हणूनच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर राज्यासह देशाचे लक्ष राहणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती यांचे नाव चर्चेत आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शाहू शहाजी छत्रपती
7 जानेवारी 1948
अर्थशास्त्र, इतिहास व इंग्रजी साहित्य या विषयांत पदवी
शाहू महाराज छत्रपती यांचा जन्म 7 जानेवारी 1948 रोजी मुंबईत झाला. नागपूर आणि बंगळुरू येथील बिशप कॉटन हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. सध्याच्या छत्रपती घराण्याचे वंशज आणि नागपूरच्या भोसले घराण्यातून ते दत्तक आले आहेत. शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाच्या समाजकार्याचा आणि विचारांचा वारसा आत्मीयतेने जोपासण्याबरोबर तो पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे.
कोल्हापूर संस्थानचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे ते पुत्र आहेत. पदवी घेतल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 9 मार्च 1970 रोजी मंगसुळी (अथणी) येथील पवार परिवारातील याज्ञसेनीराजे यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला. त्यांना युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज मालोजीराजे छत्रपती असे दोन पुत्र आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेचे खासदार होते. युवराज मालोजीराजे छत्रपती हे कोल्हापूर उत्तर विधानसभेचे आमदार होते. युवराज संभाजीराजे यांच्या पत्नीचे नाव संयोगिताराजे असून, त्यांच्या मुलाचे नावा शहाजीराजे छत्रपती आहे. युवराज मालोजीराजे यांच्या पत्नीचे नाव मधुरिमाराजे असे असून, त्यांना यशस्विनीराजे आणि यशराजे ही दोन अपत्ये आहेत. श्रीमंत शाहू महाराज यांना वाचनाची खूप आवड आहे.
शैक्षणिक संस्था, शेती
कोल्हापूर
काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार
शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या गादीचे वारसदार आहेत. स्वातंत्र्यानंतर संस्थान खालसा झाल्यानंतर त्यांची कोल्हापुरात करवीर अधिपती अशी ओळख आहे. यातील शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांनी आताच्या शाहू महाराज छत्रपती यांना नागपूरकर भोसले यांच्याकडून दत्तक घेतले. शाहू महाराजांना दत्तक घेतल्यानंतर कोल्हापुरात हे दत्तक प्रकरण खूपच गाजले होते. शाहू महाराजांना दत्तक म्हणून घ्यायला करवीरकरांचा विरोध होता आणि त्यासाठी अनेक आंदोलनंदेखील झाल्याचे सांगितले जाते.
1970 च्या दरम्यान महाराज दत्तक आल्यानंतर आणि शहाजी महाराजांच्या निधनानंतर 1984 ला सध्याचे शाहू महाराज छत्रपती गादीवर आले. दत्तक प्रकरणावरून झालेला वाद यामुळे ते फारसे सार्वजनिक जीवनात नव्हते. मात्र, 1995 ला युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शाहू महाराज छत्रपती यांच्यासह कोल्हापुरातील अनेक मोठी घराणी शिवसेनेमध्ये गेली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचीदेखील शाहू महाराज छत्रपती यांच्याशी जवळीक आहे. यातूनच 1999 ला राष्ट्रवादीमधून शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह करण्यात आला होता. मात्र, त्यावेळेस शाहू महाराजांनी त्याला स्पष्ट नकार दिला होता.
शाहू महाराज छत्रपती कोणत्याही एका राजकीय व्यासपीठावर नसले तरी कोल्हापुरात सर्व राजकीय पक्ष, संघटनांकडून त्यांचा तितकाच आदर केला जातो. अलीकडे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय कोल्हापुरातील सभेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आठ तास आंदोलनासंदर्भात महामार्गावर रास्ता रोको केले होते. त्यावेळीदेखील शाहू महाराज यांनी भेट घेऊन तोडगा काढण्याचा सल्ला राजू शेट्टी यांना दिला होता. अलीकडच्या दोन-तीन महिन्यांत त्यांच्या राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत.
कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शाहू महाराज छत्रपती यांनी शहरासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अनेक शासकीय कार्यालये, जागा आणि मैदान कोल्हापूरच्या विकासासाठी खुले करण्यासाठी त्यांचे योगदान राहिले आहे. शिवाय राजर्षी शाहू महाराज यांचा समतेचा विचार कोल्हापूरसह राजभरात पसरवण्याचे काम ते करत आहेत.
निवडणूक लढवली नव्हती.
निवडणूक लढवली नव्हती.
दत्तक प्रकरणानंतर शाहू महाराज छत्रपती सार्वजनिक जीवनात फार कमी दिसत होते. अलीकडच्या काळात त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे विचार अनेक कार्यक्रमांतून ते पोहोचवत असतात. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ते लोकांच्या संपर्कात राहतात.
सोशल मीडियावर सध्या ते ॲक्टिव्ह नाहीत.
अलीकडच्या काळात श्रीमंत शाहू महाराज यांची राजकीय विधाने चर्चेत राहिली आहेत. राज्यसभेच्या उमेदवारीवरून संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दलचे विधानही चर्चेत राहिले होते. शिवाय शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर त्यांनी पक्षांतर कायद्याबाबत त्यांनी भूमिका मांडली होती. पक्षांतर का करतात, हे सर्व जनतेला माहिती आहे, असे विधान त्यांनी केले होते. नुकतेच शरद पवार (Sharad Pawar) कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या उद्योग धोरणाबाबत भाजपवर टीका केली होती. सर्वच उद्योग गुजरातला पळवता, महाराष्ट्राच्या वाटेला शेपूट ठेवता का, असे विधान त्यांनी केले होते.
कुणीही नाही
राजर्षी शाहू, फुले, आंबेडकर यांचा समता, बंधुता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांचा पुरस्कार करणे, त्यांचा प्रचार आणि प्रसार करणे. शाहू महाराज छत्रपती यांचे सर्व राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत. संवेदनशील विषयावर तत्काळ भूमिका घेत मार्ग काढण्याची भूमिका ते स्वीकारतात. कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तत्परता त्यांनी दाखवली आहे.
निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha) काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून निश्चित मानले जात आहेत. मात्र, अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी नाकारली तर त्याचा फारसा परिणाम त्यांच्यावर पडणार नाही. शिवाय ते पूर्वीपासूनच राजकारणापासून अलिप्त असल्यामुळे ते बंडखोरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या उलट सध्या महाविकास आघाडीकडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार नाही. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपानेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी बाजी मारू शकते.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.