Dahiwadi News : छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच Chhatrapati Shivaji Maharaj भारतात संस्कृती टिकून आहे. शिंगणापूरचा शंभू महादेव हे त्यांचं कुलदैवत आहे. देवभक्ती, देशभक्ती या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येकाच्यात देवभक्ती, राष्ट्रभक्ती असली पाहिजे. तुम्ही सर्वजण सेवेच्या कामात मग्न व्हा मग तुमच्या जीवनात कशाचीच कमतरता राहणार नाही, असा कानमंत्र आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravishankar) यांनी आज दिला.
शिखर शिंगणापूर (ता. माण) येथे तीर्थक्षेत्र फाऊंडेशन, ग्रामस्थ व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्यावतीने आयोजित कोटी लिंगार्चन सोहळ्याच्या मंडप पूजन व धर्म ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री हादेव जानकर, आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, उद्योगपती रविंद्र भारती, आर्ट ऑफ लिव्हिंग विश्वस्त राजे शास्त्रेय, शेखर मुंदडा, मोहन बडवे उपस्थित होते.
श्री श्री रविशंकर म्हणाले, आज देवांच्या ध्वाजाचं आरोहण झालं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती समृध्दी येणार आहे. तुमचं दु:ख घेवून जाण्यासाठी आज मी येथे आलोय. सर्व सुखी राहोत हीच संतांची भावना असते. प्रत्येकाच्या शरीरात संताचा अंश असतो. तो अंश जागृत करा म्हणजे तुम्ही सुध्दा सर्वांच्या सुखाची इच्छा कराल. जिथे भक्ती, साधना आहे तिथे शारीरिक, मानसिक, आत्मिक शक्ती वाढीस लागते.
आपल्या आद्य दैवताचे स्मरण, भजन आपल्यातील शक्ती जागृत करण्यासाठी करा. ते म्हणाले, शिंगणापूर हे क्षेत्र खुपच अद्भुत आणि सुंदर आहे. भारतात कुठेही नाही असे एका ठिकाणी दोन लिंगे असणारे हे अतिशय विशेष स्थान आहे. या परिसरात असलेले वटवृक्ष तोडले जाणार नाहीत याची काळजी घ्या. खरंतर कोणतीच झाडं तोडली नाही पाहिजेत. याठिकाणी एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प घेण्यात आला आहे ही खुप आनंदाची गोष्ट आहे.
वृक्षारोपण व जलसंधारणाच्या कामात सर्वांनी सहभागी व्हा. येथे जलतारा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे राबवूया. तुम्ही सर्वजण एकत्र येवून काम करा. सुरुवातीला श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते शंभू महादेव व श्री विष्णूचा अभिषेक करण्यात आला. तर कार्यक्रम संपल्यानंतर गुप्तलिंग येथे वृक्षारोपण करण्यात आले. या संपुर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन मुख्य समन्व्यक अक्षयमहाराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.