
Kolhapur News : गोकुळ दूध संघामध्ये संचालिका शौमिका महाडिक यांनी डीबेंचरच्या रकमेवरून मोर्चा काढल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांचे नाव न घेता आम्ही गोकुळमध्ये सत्ता घेऊन कुणाच्याही जावयाला मोठे केले नाही, असा प्रति टोला लगावला होता. त्याला आता महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट उत्तर दिले आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या जावयाची इतकीच ऍलर्जी तुम्हाला होती तर वाढीव दराने पुन्हा त्याच जावयाला का ठेका दिला? असा सवाल प्रताप पाटील कावनेकर यांनी केला आहे. दरम्यान, डीबेंचर हा मुद्दा पुढील येत्या काळात नक्कीच तापणार असून आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात कोणती भूमिका घेण्याबाबत महाडिक यांच्यासोबत बैठक घेऊन दिशा ठरवली जाणार आहे, अशी माहिती देखील देण्यात आली.
'जिल्हा सहकारी दूध संघावर (गोकुळ) डिबेंचरसाठी मोर्चा काढला होता, तो मुद्दा बाजूला ठेवून वसूबारसच्या कार्यक्रमात नेत्यांनी दिशाभूल करून मोर्चाला राजकीय रंग दिला. आमची डिबेंचरची मागणी आजही कायम आहे. त्यासाठी आम्ही दिवाळीनंतर संस्था, सभासदांची सभा घेणार आहे. सहकार विभागाकडे दाद मागणार आहे, प्रसंगी न्यायालयात जाणार आहे.
गतवर्षीप्रमाणे डिबेंचर द्यावा आणि उर्वरित रक्कम आम्हाला परत करावी, अशी मागणी असल्याचे माजी संचालक विश्वास जाधव यांच्यासह सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, 'आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा 40 टक्के डिबेंचर घेतला आहे, त्याला विरोध आहे. गेल्या दहा वर्षांचे अहवाल दाखवत त्यामध्ये आजपर्यंत इतकी मोठी रक्कम कधी कपात केली नाही. त्यामुळे आमचा विरोध आहे. डिबेंचरसाठी मोर्चा निघाला होता, त्यावेळी संचालक अरुण डोंगळे यांच्यासह इतरांनी तुमचे समाधान करू, अशी सकारात्मक चर्चा केली, मात्र वसूबारस कार्यक्रमात डिबेंचरची मागणी बाजूला ठेवून राजकीय रंग दिला.
दुधाला एक रुपया जादा दर दिला त्याचे स्वागत आहे, पण ही नेहमीची प्रक्रिया आहे. नेत्यांबद्दल बोलण्याइतपत आमची उंची नाही, पण त्यांनी डिबेंचरचा मुद्दा बाजूला ठेवून राजकीय मुद्दा पुढे केला. याला आमचा विरोध आहे. आम्ही मागणी केली म्हणून संचालिका शौमिका महाडिक आमच्यासोबत आल्या आहेत. त्याला राजकीय मुद्दा करू नये.
आम्ही दिवाळी झाल्यानंतर संस्था, सभासदांची एक सभा घेणार आहे. त्यामध्ये सर्वांची मते जाणून घेऊन सहकार विभागाकडे दाद मागणार आहे. तेथे न्याय मिळत नसेल तर न्यायालयात जाणार आहे.' पत्रकार परिषदेस 'गोकुळ'चे माजी संचालक धैर्यशील देसाई, राधानगरीचे पंचायत समितीचे माजी उपसभापदी रवीश पाटील, राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील, प्रताप पाटील-कावणेकर आणि प्रमोद पाटील उपस्थित होते.
मिठाचा खडा नव्हे पोतेच आहे...
'गोकुळमध्ये मिठाचा खडा पडू नये, पण मिठाचे पोतेच शेजारी घेवून बसला आहात. त्यामुळे दूध नासायला वेळ लागणार नाही. गोकुळवर सत्ता येऊन पाच वर्षे झाली, तरीही महाडिक यांचा जावईच दिसतो कसा? पाच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता गोकुळमध्ये असताना महाडिकांच्या जावयांचा ठेका का रद्द केला नाही. जादा पैसे देऊन त्यांनाच परत ठेका दिला. चांगले काम होते म्हणूनच दिला आहे. तो ठेका रद्द का करू शकला नाहीत', असा सवाल प्रताप पाटील यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.