

Mahayuti Letter : आमदार सतेज पाटील यांनी गोकुळमधील घडामोडींबाबत आपल्याला पत्र लिहून साडे पाच लाख दूध उत्पादकांच्या हिताची आणि लोकशाहीची चिंता व्यक्त केली आहे. त्यांची भूमिका आम्ही वाचली. मात्र, त्यांच्या या भावना लोकशाहीसाठी कमी आणि स्वतःच्या राजकीय सुलभतेसाठी अधिक असल्याचे जाणवले. म्हणून लोकशाहीचा अर्थ केवळ आपल्या बाजूने मिळालेला कौल एवढाच नसतो, हे सांगण्यासाठीच आम्ही आपल्यासमोर वस्तुस्थिती स्पष्ट करीत आहोत, असे प्रसिद्धी पत्रक महायुतीच्यावतीने काढण्यात आले. या पत्रकावर महायुतीमधील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे बाबा बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, शिवसेनेचे विजय बलुगडे, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची स्वाक्षरी आहे.
पत्रकात म्हटले की, गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ संचालक त्यांचे निवडून आले, त्याच पद्धतीने १२ संचालक आमचेही याच जिल्ह्यातील मतदारांनी निवडून दिले आहेत. त्यामुळे साडे पाच लाख दूध उत्पादकांचा कौल केवळ आपल्यालाच मिळाला, अशा आविर्भावात सतेज पाटील यांनी राहू नये. एका जागेच्या फरकाने मिळालेला विजय म्हणजे संपूर्ण जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व नव्हे, याची जाणीव त्यांनी ठेवावी. विरोधी आघाडीला १३ जागा मिळालेल्या आहेत. अध्यक्ष निवड करण्यासाठी आम्ही कुणाचीही अडवणूक केलेली नाही. त्यांनी त्यांचा अध्यक्ष जरूर करावा. आमच्यावर विरोधकांची भूमिका सोपवलेली आहे. ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत आहोत.
निवडणुकीमध्ये महायुतीतील अंतर्गत मतभेदांचा फायदा त्यांना झाला, हे आम्ही मान्य करतो. पण, त्यातून जिल्ह्याचा संपूर्ण राजकीय जनाधार बदलला, असा निष्कर्ष त्यांनी काढू नये. या काठावरच्या विजयाच्या आधारे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय प्रतिनिधित्व आपल्याकडेच असल्याचा दावा करणे म्हणजे उर्वरित मतदारांच्या कौलाकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. २५ संचालकांच्या मंडळात गणपूर्तीसाठी १४ संचालकांची आवश्यकता असल्याचा मुद्दा गोकुळच्या पोटनियमांमधून निर्माण झाला आहे. हा नियम आम्ही निवडणुकीनंतर तयार केलेला नाही. आमचे १२ संचालक हे आमच्या मतदारांनी आमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिले आहेत. त्यामुळे केवळ दुसऱ्या बाजूची गणपूर्ती पूर्ण व्हावी म्हणून त्यांनी उपस्थित राहावे, अशी अपेक्षा करणे म्हणजे त्यांच्या मतदारांच्या विश्वासाशी प्रतारणा करण्यास सांगण्यासारखे आहे. तसेच, शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांकडून निवडणुकीपूर्वीच घोषणा झाली होती. तरीही जनतेने महायुतीला १२ जागांवर कौल दिला. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला कोणाचा वैयक्तिक विरोध हा आमचा मुद्दा नसून, आमच्या मतदारांनी दिलेल्या कौलाशी प्रामाणिक राहणे ही आमची भूमिका आहे.
आज अध्यक्ष निवडीवरून त्यांच्याकडून भावनिकतेची ढाल केली जात आहे. त्याबद्दल आम्ही इतकंच म्हणू इच्छितो की, आम्हालाही आमच्या बाजूने अध्यक्ष निवडताना गणपूर्तीसाठी केवळ दोन संचालकांची आवश्यकता आहे. मग सतेज पाटील त्यांच्या बाजूचे दोन संचालक आम्हाला देऊन आमच्या अध्यक्ष निवडीसाठी आणि गोकुळचा कारभार सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करतील का? ते असे सहकार्य करणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मग केवळ पेच तयार झाला आहे म्हणून स्वतःच्या सोयीसाठी आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करायची आणि त्यासाठी भावनिक आवाहने करायची, हा कोणता न्याय आहे? नियम दोन्ही बाजूंना समान असले पाहिजेत. शेवटी गणपूर्ती, अध्यक्ष निवड आणि अन्य कायदेशीर प्रश्नांचा निर्णय कायदा व संस्थेच्या पोटनियमांनुसारच झाला पाहिजे. त्यासाठी न्यायालयीन मार्ग उपलब्ध आहे आणि आम्ही त्याच मार्गाने आमची भूमिका मांडत राहू.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, हा पेच निर्माण झाल्यापासून सतेज पाटील समर्थकांकडून समाज माध्यमांवर चिथावणीखोर भाषा वापरली जात आहे. अश्या प्रकारची भाषा लोकशाहीला शोभणारी नाही. एका काठावरच्या विजयाला राजकारणातील अमरपट्टा समजण्याची चूक त्यांनी करू नये. राजकीय मतभेदांना धमक्यांचे स्वरूप देण्याऐवजी लोकशाहीच्या चौकटीत चर्चा व्हावी, हीच आमची अपेक्षा आहे. गेले अनेक दिवस आम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले मात्र इथून पुढच्या काळामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांकडूनही जशास तसेच प्रत्युत्तर दिले जाईल.
गोकुळ ही कोणत्याही एका राजकीय पक्षाची किंवा नेत्याची मालमत्ता नसून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टातून उभी राहिलेली सहकारी संस्था आहे. तिचे हित जपताना कोणाच्याही राजकीय प्रतिष्ठेपेक्षा कायदा, लोकशाही आणि संस्थेचे हित महत्त्वाचे असले पाहिजे. राज्यातील सर्व संपादक आणि पत्रकार बंधू-भगिनींना आमचे नम्र आवाहन आहे की, गोकुळमधील या संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती दोन्ही बाजूंच्या भूमिकांसह समजून घ्यावी. कोणाच्याही राजकीय दबावाला किंवा भावनिक आवाहनांच्या खेळाला बळी न पडता सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी. लोकशाहीत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या विषयात वस्तुनिष्ठ पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेला योग्य माहिती मिळावी, यासाठी आपण सहकार्य करावे, ही विनंती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.