

Pandharpur, 24 September : राज्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत आहे. पण महायुती सरकार दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत आणि उपाय योजना करण्यास चालढकल करत आहे, असा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने फडणवीस सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात शनिवारी (ता. 26 सप्टेंबर) भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती माढ्याचे पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिली.
सरकारविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी गुरुवारी (ता. 24 सप्टेंबर) पंढरपुरात माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर आमदार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
आमदार पाटील म्हणाले, यावर्षी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची गडद छाया आहे. पावसाअभावी खरीप पिके जळून गेली आहेत, तर उसाची वाढ खुंटली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे, तरीही सरकारचे दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष आहे.
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी शनिवारी (ता. 26 सप्टेंबर) पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सरकारविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. मोर्चामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह सर्व आमदार आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातून हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आतापर्यंत कुठलीही भरीव अशी मदत जाहीर केलेली नाही.
मागील महिन्यातच सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे होती. परंतु सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टिकाही आमदार पाटील यांनी केली. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, चारा छावण्या सुरु कराव्यात आदी प्रमुख माण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
या वेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, संजय पाटील घाटणेकर, दीपक वादेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.