

Solapur, 29 November : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अण्णा बनसोडे हे दोन दिवसांच्या सोलापूर शहर-जिल्हा दौऱ्यावर आहेत. शनिवारी रात्री त्यांनी हॉटेल बालाजी सरोवरमध्ये मुक्काम केला. त्यापूर्वी त्यांनी एमआयएमचे माजी शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांची सदिच्छा भेट घेतली. होटगी रोडवरील शाब्दी यांच्या निवासस्थानी बनसोडे व शाब्दी यांच्यात तब्बल दोन तास बंद खोलीत चर्चा झाली. त्यांच्या या भेटीमुळे नव्या समीकरणांच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
महापालिका निवडणुकीत अपयशापासून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमालीची शांतता दिसत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर ही शांतता अधिकच भयाण झाली आहे. जशी स्थिती सोलापूर शहर राष्ट्रवादीची आहे, तशीच काहीशी स्थिती शाब्दी यांची आहे. महापालिका निवडणुकीत त्यांनी एमआयएमला सोडचिठ्ठी दिली; तेव्हापासून राजकीय झेंड्यापेक्षा शाब्दी सोशल ॲंड वेल्फेअर असोसिएशनच्या नावावर त्यांनी सार्वजनिक काम सुरू ठेवले आहे.
शहरातील मुस्लिम समाज आणि मुस्लिम भागाच्या विकासाला निधी मिळत नसल्याने फारुक शाब्दी यांनी आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनात शिवसेनेने मध्यस्थी केली. आंदोलनाच्या निमित्ताने शिवसेना आणि शाब्दी यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचे दिसत होते. शाब्दी शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चाही त्यावेळी रंगली होती. त्यानंतर मात्र हा विषय पूर्णपणे थांबल्याचे दिसले.
आता राष्ट्रवादीचे नेते बनसोडे आणि शाब्दी यांच्यात झालेल्या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. या वेळी माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, दशरथ कसबे, नसीम खलिफा, राजा बागवान, कोमारोव्ह सय्यद आदी उपस्थित होते.
एमआयएमने शहराध्यक्ष नेमला; आता शाब्दी पक्ष निवडणार
महापालिका निवडणुकीदरम्यान शाब्दी यांनी एमआयएमच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून एमआयएमने शहराध्यक्ष नेमला नव्हता आणि शाब्दींनीही दुसरा पक्ष निवडला नव्हता. एमआयएमच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अजहर हुंडेकरी यांची निवड झाली आहे. आता शाब्दी कोणत्या पक्षाची निवड करणार? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली असून, लवकरच या प्रश्नाचेही उत्तर मिळेल, अशी माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.