Shambhuraj Desai : शंभूराज देसाईंनी मनातलं बोलून दाखवलंच : ‘ZP अध्यक्ष निवडीवेळी झालेली जखम फक्त वरून बरी झालीय...’

Satara Dcc Bank Election 2026 : पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेना महायुतीचा धर्म पाळून लढणार असल्याचे स्पष्ट केले. मागील जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीतील प्रकारांची पुनरावृत्ती होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desai Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Karad, 11 August : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या प्रकारात माझ्या बोटाला लागले होते. त्या वेळच्या जखमा फक्त वरून बऱ्या झाल्या आहेत, अशी खोचक टिपण्णी करुन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना पक्ष महायुतीचा धर्म पाळूनच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. मागील वेळी ज्या गोष्टी झाल्या, त्याची पुनरावृत्ती होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

कऱ्हाड (जि. सातारा) येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी महायुती म्हणून निर्णय झाला नव्हता, त्या पार्श्वभूमीवर आगामी सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका काय असेल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देसाई यांनी, शिवसेना महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नुकतीच भेट घेतल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ही भेट पूर्णपणे औपचारिक होती. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावर लिहिण्यात आलेला दौलत हा चरित्रग्रंथ पवार यांना भेट द्यायचा होता. त्यासाठी त्यांची वेळ मागितली होती. त्यांनी दिलेल्या वेळेनुसार माझी व त्यांची भेट झाली. या भेटीत जिल्हा बँक किंवा अन्य राजकीय विषयांवर कोणतीही चर्चा झाली नाही.

शिवसेना पक्ष व चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी केलेली वक्तव्ये कधी खरी ठरली आहेत का, हे तपासा. त्यांचे अनेक तीर हवेतच असतात, अशी टिपण्णी केली.

या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू असून, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतरही न्यायालयाचे कामकाज होणार आहे. टायटल यायचे आहे, अजून बराच पिक्चर बाकी आहे, असे सांगत या प्रकरणावर आताच निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

Shambhuraj Desai
Lad Vs Hake : आमदारकीसाठी शिंदेंच्या घरासमोर 2-2 तास बसणारे ओबीसींचं काय हित साधणार? : प्रसाद लाडांचा हाकेंवर हल्लाबोल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना देसाई यांनी, हा दौरा राज्यातील विकास कामांसंदर्भात होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे येणारा ओढा यापुढेही कायम राहील, असे सूचक विधानही देसाई यांनी केले.

ते म्हणाले, कुणबी नोंदी शोधण्यासाठी आणि त्यांचे भाषांतर करण्यासाठी सरकारने तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोंदी सापडल्या आहेत. त्यानुसार वंशावळ निश्चित झाल्यानंतर जात पडताळणीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा बांधवांसाठी जे जे करता येईल, ते सर्व करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

जरांगे-पाटील यांचा गैरसमज दूर करू

आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मनोज जरांगे-पाटील यांच्याशी समन्वय साधण्याची जबाबदारी मी आणि मंत्री उदय सामंत यांच्यावर होती. त्या काळात झालेल्या सकारात्मक निर्णयांबाबत जरांगे-पाटील यांनी आपल्याकडे समाधान व्यक्त केले होते, असे मंत्री देसाई म्हणाले.

दुसऱ्याच्या ताटातून काढून कुणालाही द्यायचे नाही

मराठा समाजासाठी जे काही करता येईल, ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली करु. जरांगे-पाटील यांचा आमच्या काही सहकाऱ्यांबाबत गैरसमज झाला आहे, तो आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करु. आमचे नेते एकनाथ शिंदे सर्व सहकाऱ्यांना त्याबाबत सूचना देतील. ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता देसाई यांनी दुसऱ्याच्या ताटातून काढून कुणालाही द्यायचे, असे आम्ही करणार नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

Shambhuraj Desai
Satara Politic's : मंत्री जयकुमार गोरेंच्या बंधूंनी पुन्हा शड्डू ठोकला; 'आपल्यामुळे अनेकांनी गुलाल उधाळला; आता ताकदीने लढणार...'

निधी वाटपात समानता राखा

कऱ्हाड पंचायत समितीच्या मासिक सभेत सेस फंडाच्या वाटपावरून सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये वादावादी झाल्याची माहिती आपल्या सदस्यांकडून मिळाली आहे, असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, शासकीय अधिकाऱ्यांनी सत्ताधारी आणि विरोधक असा कोणताही भेदभाव न करता निधी वाटपात समतोल साधला पाहिजे. जिल्हा परिषदेत निधी वाटप करताना समानता राखावी लागते. अध्यक्ष व उपाध्यक्षांना पाच टक्के निधीच्या वापराचे अधिकार असतात. मात्र अन्य बाबतीत अधिकाऱ्यांनी समतोल भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे निधी वाटप करताना प्रशासनाने तटस्थ राहावे अशा सूचना देण्यात येतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com