Sangli Political News : राजकीय वारसासाठी आजी-माजी मंत्र्यांच्या पायाला भिंगऱ्या; सांगलीत पुत्रप्रेमापोटी पेरण्या सुरू

Maharashtra Politics : सांगली जिल्ह्यातील आजी-माजी मंत्र्यांसह खासदार व आमदार पुत्रांच्या राजकीय इच्छा जागृत झाल्या आहेत.
Sangli Politics
Sangli PoliticsSarkarnama
Published on: 
Updated on: 

राहुल गडकर

Sangli News : राज्यातील सत्तासंघर्षामुळे सर्वच जिल्ह्यांतील समीकरणे बिघडली आहेत. पक्षा-पक्षात झालेले दोन गट आणि भाजपबाबत असलेल्या नाराजीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी याचा धसका घेतला आहे. बेरजेच्या राजकारणामुळे कुणाचाही पत्ता कट होऊ शकतो, अशी भीती आतापासूनच अनेकांना वाटू लागली आहे. त्याचा अंदाज अनेकांना आला आहे. त्यातच आपल्या युवराजांची राजकीय इच्छा जागृत झाली असेल तर त्यांचे लाड पुरवण्याचे काम वडील करताना दिसत आहेत. पुत्रांच्या राजकीय भविष्याची काळजी सांगलीतील आजी-माजी मंत्र्यांसह खासदार, आमदारांना लागली आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मात्तबरांनी आतापासूनच पायाला भिंगऱ्या बांधून सुरुवात केली आहे.

सांगली जिल्ह्यातील आजी-माजी मंत्र्यांसह खासदार व आमदार पुत्रांच्या राजकीय इच्छा जागृत झाल्या आहेत. आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा चालवण्यासाठी युवराजांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे, तर वडीलधाऱ्यांनी आपली ताकद पुत्रप्रेमासाठी खर्ची घालण्यास सुरुवात केली आहे. आपल्या मुलाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आतापासूनच जोडण्या लावण्यास सुरुवात केली असून, आपापल्या मतदारसंघात पेरण्या सुरू केल्या आहेत.

Sangli Politics
Tuljapur Political News : उद्धव ठाकरेंपुढे गणेश सोनटक्केंनी रोचकरींना ठोक-ठोक ठोकलं, अन् आमदारकी गमावली

सांगली विधानसभामधून आमदार सुधीर गाडगीळ यांनी त्यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांना विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची तयारी केली आहे. आपल्या विकासकामांच्या उद्घाटनात सिद्धार्थची लॉंचिंग करण्यास सुरुवात केली आहे, तर कामगारमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनीदेखील मिरज विधानसभा मतदारसंघातून पुत्र सुशांत खाडे याला राजकीय पटलावर आणले आहे.

सुशांतला राजकीय व्यासपीठावर आणल्यानंतर एकेकाळाचे त्यांचे स्वीय सहायक मोहन व्हनखंडे पालकमंत्री खाडे यांच्या विरोधात शड्डू होऊन उभे आहेत. नुकत्याच झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात खाडे यांनी सुशांतची एंट्री करून आपला राजकीय वारसा दाखवून दिला आहे. माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनीदेखील पुत्र प्रतीक पाटील यांच्यासाठी थेट लोकसभेच्या मैदानाची तयारी केली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पुत्र प्रतीकसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील हेदेखील पडद्यामागून राजकीय हालचाली खेळून पुत्रासाठी बेरजेचे राजकारण करत असल्याचे बोलले जात आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्येही तेच चित्र आहे. आमदार सुमनताई पाटील यांनी आतापासूनच रोहित पाटील यांच्यासाठी जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे.

रोहित यांना पुढील विधानसभा निवडणूक लढवता येण्यासाठी रोहितच्या रूपाने पैलवान लांघ बांधून तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. टेंभू योजनेच्या पाण्यावरून रोहित यांना आशीर्वाद देऊन जनमानसात उतरण्यासाठी धडपड सुरू केली आहे. दुसरीकडे आमदार सुमनताई पाटील यांच्या विरोधात खासदार संजय पाटील हे त्यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांना उतरवण्याच्या तयारीत आहेत.

Sangli Politics
Nitin Gadkari : नितीन गडकरींनी घेतली हायड्रोजन बसची चाचणी; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

विकासकामांच्या उद्घाटनासाठी मतदारसंघात प्रभाकरला नारळ वाढवण्याचे श्रेय देत आहेत. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुत्र प्रभाकर पाटील यांना सोबत घेतल्याने तासगावच्या राजकारणात त्यांच्या विधानसभेची तयारी सुरू झाली असल्याचं बोलले जात आहे.

एकंदरीतच पाहता सांगली जिल्ह्यातील मातब्बरांनी पुत्र प्रेमासाठी जंग पछाडले आहे. आगामी निवडणुकीत त्याचे काय परिणाम होणार हे पाहणे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Sangli Politics
Parbhani BJP Politics : ठाकरे गटापासून दुरावलेल्या ब्राह्मण मतदारांवर भाजपचा डोळा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.