

मिरज पंचायत समितीची 5 कोटींची इमारत पूर्ण होऊन दोन वर्षे झाली असली तरी उद्घाटनावरून वाद निर्माण झाला आहे.
भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये उद्घाटनाचा मान कोणाला मिळणार यावरून संघर्ष वाढला आहे.
विविध पक्षांनी आपल्या नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याचा आग्रह धरल्याने राजकीय तणाव वाढला आहे.
मिरज : शंकर भोसले
मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा राजकीय नाट्यामुळे पुन्हा लांबणीवर पडला आहे. आमदार सुरेश खाडे यांच्या निधीतून पूर्ण झालेल्या या इमारतीची फीत भाजप मंत्र्यांच्या हस्तेच कापली जावी, असा त्यांचा आग्रह आहे. समितीत सत्तेत असलेल्यांनी आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले होते. त्यातून संघर्ष उफाळला आणि उद्घाटन पुन्हा लांबणीवर पडले.
आमदार सुरेश खाडे यांच्या प्रयत्नांतून मिरज पंचायत समितीची पाच कोटी रुपयांची नूतन प्रशासकीय इमारत पूर्ण झाली. या इमारतीचे काम पूर्ण होऊन जवळपास दोन वर्षे उलटली आहेत. आता उद्घाटनाची चर्चा ऐरणीवर आहे. पंचायत समितीत काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता आहे. सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेपासून वंचित राहिल्याने भाजप नेत्यांना सल आहे. या जखमेवर मीठ चोळणारा निर्णय घेत सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील, विशाल पाटील यांच्या हस्ते इमारतीच्या उद्घाटनाचे नियोजन केले आहे.
शिष्टाचारानुसार आमदार सुरेश खाडे हे प्रमुख उपस्थित असतीलच. गटविकास अधिकाऱ्यांनी हे नियोजन आमदार खाडे यांना कळवले. त्यांनी तत्काळ त्याला विरोध दर्शवला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम व्हावा, असा त्यांचा आग्रह आहे.
सत्ताधारी पदाधिकारी व सदस्यांनी मात्र उद्घाटनाचा सोहळा रेटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सभापती तन्वी कमलेकर आणि उपसभापती ललिता शेजुळ यांनी त्यासाठी बैठकांचे फेर सुरू केले आहेत. त्याचा परिणाम काय होतो, याकडे लक्ष असेल. पंचायत समितीची पहिली सभा नव्या इमारतीमध्ये घेण्याचा गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांचा प्रयत्न होता.
परंतु, सभापतींनी उद्घाटनानंतरच तिथे जाऊ, अशी भूमिका घेतली. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे चेंडू सोपवण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून चार महिने मिरजेत काम केलेल्या नरवाडे यांना हा तिढा सुटतो का, हे पाहावे लागेल.
शिंदे शिवसेनेचा आग्रह
मिरज पंचायत समितीत सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेकडून या उद्घाटन सोहळ्यास त्यांच्या पक्षाचे मंत्रीही बोलवावेत, असा आग्रह आहे. तसा आग्रह मोहन वनखंडे यांनी धरला आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह पक्षाचे नेते येतील, असे ते सांगत आहेत.
1. मिरज पंचायत समिती इमारतीचा वाद काय आहे?
उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.
2. या प्रकल्पासाठी निधी कोणी दिला होता?
आमदार सुरेश खाडे यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.
3. कोणते पक्ष या वादात सहभागी आहेत?
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष दिसत आहे.
4. उद्घाटनाचा कार्यक्रम का अडकला आहे?
वेगवेगळ्या नेत्यांच्या उपस्थितीबाबत मतभेद असल्यामुळे कार्यक्रम लांबला आहे.
5. पुढे काय होऊ शकते?
राजकीय तोडगा निघाल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.