
Solapur, 20 June : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा गेली दोन महिन्यांपासून राज्यात सुरू आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात गुरुवारी (ता. 20 जून) उद्धव ठाकरेंनीही ‘जनतेच्या मनात जे आहे, तेच होईल,’ असे सांगितले आहे, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत उत्सुकता वाढली आहे. यासंदर्भात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही मोठे विधान केले आहे. तसेच, बाळासाहेब ठाकरे हयात असताना दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न मी केला होता, अशी आठवणही सांगितली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना माजी गृहराज्य मंत्री नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केले आहे.
माजी मंत्री नांदगावकर म्हणाले, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनात जे आहे, तेच माझ्या मनात आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाचा तो काळ होता, त्यावेळी उद्धव आणि राज यांना एकत्र करण्याचा प्रयत्न मी केला होता. एखादी गोष्ट झाली, तर राजकारणामध्ये चांगलं-वाईट घडत असतं. पण, पुढे काय होईल, याची मला कल्पना नाही.
राजकारणात वेळ नेहमीच येत असते. मात्र, कुठलीच वेळ कधी वाईट नसते. महाभारतात एक वाक्य आहे 'समय बडा बलवान होता है.' या वाक्यात बरेच काही अर्थ असतात, असेही नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
युतीबाबत मीही राज ठाकरे यांना विचारात आहे की, तुमच्या मनात नेमकं काय सुरु आहे. पण, मला अजून उत्तर सापडत नाही. उत्तर सापडलं की, मी तुम्हाला नक्की सांगेन, चिंता करू नका, असेही मिश्किल उत्तर बाळा नांदगावकर यांनी दिले.
हिंदीला पूर्णपणे विरोध
हिंदी सक्तीच्या करण्याच्या निर्णयावर नांदगावकर म्हणाले, या संदर्भात मनसेची काल एक बैठक झाली, त्यामध्ये हिंदी भाषेला पूर्णपणे विरोध करायचं ठरलं आहे. हिंदी भाषेविषयी आम्हाला काही वावडं नाही. मात्र, हिंदी राष्ट्रभाषा नसून राज्यभाषा आहे. कोणत्याही राज्यावर कोणत्याही भाषेची सक्ती होता कामा नये.
गरज नसताना विषय वाढवू नका : नांदगावकर
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, त्यावेळेस भाषिक प्रांत रचना झाली होती. पण, हिंदी भाषा आमच्यावर लादणार असतील, तर त्याला कडवटपणे विरोध केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाला आमची विनंती आहे. गरज नसताना एखादा विषय वाढवू नये, तो विषय योग्य वेळेला संपवणे चांगल असतं. जर उत्तर प्रदेशमध्ये मराठी भाषा घेत असतील, तर इथं ही बघता येईल, असे आव्हान नांदगावकर यांनी सरकारला दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.