

भाजपने सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांना वगळून नवे राजकीय समीकरण तयार करण्याची तयारी सुरू केली आहे, विशेषतः त्यांच्या बालेकिल्ला माळशिरसमध्ये विरोधकांना एकत्र आणण्यावर भर दिला जात आहे.
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीलेखा पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून, हा कार्यक्रम ७ नोव्हेंबरला प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
प्रकाश पाटील आणि मोहिते पाटील कुटुंबांतील दोन पिढ्यांपासूनचा राजकीय संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता असून, भाजप याच पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांना कोपर्यात आणण्याची रणनीती आखत आहे.
Solapur, 03 November : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने आता मोहिते पाटील यांना वगळून राजकारण करण्याचे ठरविल्याचे दिसून येत आहे. भाजप नेतृत्वाची विशेषतः सोलापूर जिल्ह्यात भाजपचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींची तशी पावले पडताना दिसून येत आहेत, त्यातूनच बालेकिल्ला असलेल्या माळशिरसमध्येच मोहिते पाटलांच्या विरोधात मोर्चेबांधणी केली जात आहे. माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे माळशिरसमधील उमेदवार निवडीचे अधिकार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोपविले आहेत, त्यातच आता मोहिते पाटलांच्या पारंपारिक विरोधकाचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार आहे, त्यामुळे मोहिते पाटलांना बालेकिल्ल्यात घेरण्याची तयारी भाजपने केल्याचे स्पष्ट होत आहे.
काँग्रेसचे (Congress) माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील (Prakash Patil) आणि त्यांच्या पत्नी, पंचायत समितीच्या माजी सदस्या श्रीलेखा पाटील हे काँग्रेस विचाराचे दांपत्य येत्या शुक्रवारी (ता. ०७ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
दरम्यान, प्रकाश पाटील हे माळशिरस तालुक्यातील पानीव गावचे असून ते त्यांची गावात श्रीराम शिक्षण संस्था आहे. प्रकाश पाटील यांचे वडिल श्यामराव पाटील यांनी १९७८ च्या निवडणुकीत शंकरराव मोहिते पाटील यांचा पराभव केला होता, त्यामुळे मोहिते पाटील (Mohite Patil) आणि प्रकाश पाटील यांच्यातील राजकीय शुत्रत्व हे दोन पिढ्यापासून कायम आहे.
राज्याच्या राजकारणात मोठे नाव राखून असलेल्या मोहिते पाटील यांच्यारख्या सर्वार्थानं बलाढ्य असलेल्या नेत्याच्या तालुक्यात पाटील कुटुंबीयाने आपले राजकीय आणि इतर अस्तित्व कायम राखले होते. माळशिरस पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रकाश पाटील यांच्या पत्नी श्रीलेखा पाटील या निवडून आल्या होत्या. तसेच, काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्षपदही पाटील कुटुंबीयाने भूषविले आहे, त्यामुळे माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकिट नाकारल्यानंंतर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढून जिंकली आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही माळशिरसमधून पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आलेला आहे. या दोन्ही निवडणुकीत भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील हे अलिप्त होते.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मोहिते पाटील यांनी भाजपशी जुवळून घेतल्याचे दिसून येत आहे. लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांचे काम करणारे त्यांचे काका जयसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत रणजितसिंहांचे काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, राम सातपुते यांनी त्यास विरोध दर्शविला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत उमेदवार निवडीचे अधिकार पालकमंत्री गोरे यांनी माजी आमदार राम सातपुते यांना दिले आहेत. त्यानंतर मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा केलेला प्रयत्न आणि आता कट्टर विरोधक प्रकाश पाटील यांना पक्षात प्रवेश देण्याचा घेतलेला निर्णय यामुळे मोहिते पाटलांची भाजपकडून कोंडी होताना दिसून येत आहे, त्यामुळे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी मोहिते पाटील कोणती खेळी करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Q1. भाजपने सोलापूर जिल्ह्यात कोणाविरुद्ध मोर्चेबांधणी सुरू केली आहे?
A1. भाजपने माळशिरस मतदारसंघात मोहिते पाटील यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Q2. प्रकाश पाटील आणि श्रीलेखा पाटील कधी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत?
A2. ते ७ नोव्हेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Q3. प्रकाश पाटील आणि मोहिते पाटील यांच्यातील वाद किती जुना आहे?
A3. त्यांचा राजकीय संघर्ष दोन पिढ्यांपासून सुरू आहे.
Q4. या घडामोडींमुळे काय परिणाम अपेक्षित आहे?
A4. भाजपमध्ये मोहिते पाटील यांची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.